पार्थ पवारांसाठी पैसे वाटप; शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 07:42 PM2019-04-27T19:42:12+5:302019-04-27T19:42:42+5:30
शेकाप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करताना पकडले आहे.
नवी मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेलले आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करताना पकडले आहे. मतदारांना प्रत्येकी 400 रुपयांचे वाटप करताना रंगेहाथ ही कारवाई करण्यात आली आहे.
शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून 11 हजार 900 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 हजार 900 रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली.
चरणदीपसिंग, बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा) , महेंद्र जगन्नाथ भोपी, विजय त्रिंबक चिपळकर (नगरसेवक पनवेल मनपा) यांनी या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कामोठे पोलिसांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी भा. द.वि. कलम 171 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.