भ्रष्टाचारात पोलीसच सर्वात पुढे! गेल्या वर्षात एसीबीच्या सापळ्यात १०७६ बाबू अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:47 PM2022-03-07T17:47:03+5:302022-03-07T17:51:15+5:30
Crime News : गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक २५५ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले तर त्याखालोखाल महसूलचे २५२ जण पकडले गेले.
- सुनील पाटील
जळगाव : भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही लढे उभारले तरी तो कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. पोलीस आणि महसूल या दोन विभागात जणू भ्रष्टाचारात स्पर्धाच लागली आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक २५५ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले तर त्याखालोखाल महसूलचे २५२ जण पकडले गेले. ७६४ सापळ्यांमध्ये १०८६ जणांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यात सर्वाधिक वर्ग ३ च्या ५८९, वर्गच्या १०९ व वर्ग १ च्या ६९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जनजागृतीपर पंधरवाडा राबविण्यात येतो. लाचखोरांविरुद्ध वारंवार सापळे लावून कारवाया झालेल्या आहेत. काही प्रकरणात शिक्षाही झालेल्या आहेत, असे असतानाही लाचखोरीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. शिपायापासून तर कार्यालय प्रमुखापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पकडले गेले आहेत. बांधकाम विभागातही १० सापळे यशस्वी झाले असून १७ जणांना अटक झाली आहे. आरटीओत देखील १५ जणांना अटक झाली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त माया जमविल्याप्रकरणी राज्यात अपसंपदेचे ७ गुन्हे दाखल झाले असून ११ जणांना त्यात अटक झाली आहे.
१८ गुन्ह्यात १९ जणांना शिक्षा
लाचेच्या प्रकरणात मागील वर्षी १८ गुन्ह्यांमध्ये दोषसिध्द झाले असून १९ जणांना शिक्षा झालेली आहे. त्यात सर्वाधिक महसूलचे ७ व पोलीस विभागातील ५ जणांचा समावेश आहे. सहकार विभागाच्याही ३ जणांना शिक्षा झालेली आहे. त्यात वर्ग १ च्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या सर्वांना ३ लाख ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एकूण सापळे : ७६४
एकूण अटक : १०७६
सापळा रक्कम हस्तगत : २,६४,१९,८८१
कोणत्या विभागात किती लाचखोर?
पोलीस : २५५
महसूल : २५२
पंचायत समिती : ७८
महापालिका : ७७
जिल्हा परिषद : ६३
शिक्षण : ४१
वन विभाग : २९
इतर : २८१
वर्गनिहाय अटक आरोपी
वर्ग १ : ६९
वर्ग २ : १०८
वर्ग ३ : ५८९
वर्ग ४ : ४९
इलोसे : ९६
खासगी व्यक्ती : १६५
नव्या वर्षात दोन महिन्यात १०४ सापळे
परिक्षेत्र गुन्हे अटक आरोपी
मुंबई १० १५
ठाणे १२ १५
पुणे १९ २६
नाशिक २१ ३०
नागपूर ०७ १०
अमरावती ०७ ०८
औरंगाबाद १४ १७
नांदेड १४ १८
एकूण १०४ १३९