कडेकोट पोलीस बंदोबस्तात बाप्पांचे आगमन; लालबागच्या राजासाठी वाढीव कुमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 07:25 PM2019-09-02T19:25:54+5:302019-09-02T19:26:54+5:30
मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी एक विशेष कंमाड कंट्रोल सेंटर उभारले आहे.
मुंबई - महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन आज मोठ्या थाटामाटात झालं आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. १२०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाला होणारी बाहू गर्दी लक्षात घेता. मुंबईपोलिसांनी त्या ठिकाणी एक विशेष कंमाड कंट्रोल सेंटर उभारले आहे. त्याचप्रमाणे राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी १ अतिरिक्त सहपोलीस आयुक्त, १२ पोलीस उपायुक्त, २०० पोलीस निरीक्षक, ८०० कर्मचारी, १ एसआरपीएफ, २ सीसीटिव्ही व्हॅन, काेम्बिंग ऑपरेशन पथक, प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, हँड डिटेक्टर सह १२०० जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांनीही गणपती उत्सवादरम्यान काही मार्गांमध्ये बदल केले आहेत. मुंबईत ७६१० सार्वजनिक गणपती मंडळ असून काही ख्यातनाम मडळांच्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन समाजकंटकांनी घातपात घडवू नये, याकरता मुंबई पोलिसांनी ४४ हजाराचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महत्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस गस्तीवर असणार आहेत. शहरात बसवण्यात आलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार असून स्थानिक मंडळांना पोलीस दिवसभरात ३ ते ४ वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले, वृद्ध आणि महिलाच्या सुरक्षेसाठी स्पेशल स्काॅड तैनात राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत. यासाठी २०० हून अधिक महिला पोलिसही गणोशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. यासह ६ राज्य राखीव दल आणि पॅरामिलेटरी फोर्स, ३ हजार ६०० वाहतूक पोलीस, सशस्त्र दलाचे १०० जवान आणि हॅमरेडिओचे ३५ स्वयंसेवक असा मुंबई पोलिसांचा आणि एनजीओंचा मोठा बंदोबस्त मुंबई शहरात गणेशोत्सव काळात असणार आहे. त्यासह पोलिसांच्या मदतीला ट्रेनी पोलीस, होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी असणार आहेत.
•मुंबई शहरात गणपतींची संख्या
- घरगुती गणपती १ लाख ३२ हजार ४५२
- गौरी स्थापना ११ हजार ६६७
- सार्वजनिक मंडळ ७ हजार ७०३
- विसर्जन स्थळ - १२९
- ५ हजार सीसीटीव्हीद्वारे मुंबईवर लक्ष
- राज्य राखीव पोलीस दल १ कंपनी
- डिएफएमडी २०, एचएचएमडी ५०
- २ सीसीटीव्ही व्हॅन, ४ काॅम्बेक्ट व्हॅन