आरोपीच्या अटकेसाठी पोलीस बनले वेटर; बंगळुरूच्या हॉटेलमध्ये थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 01:17 AM2020-11-29T01:17:58+5:302020-11-29T01:18:12+5:30
सराईत गुन्हेगाराला पहिल्यांदाच झाली अटक
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : भाड्याने घेतलेल्या गाड्या परराज्यात विकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिसांना वेटरची भूमिका करावी लागली. बंगळुरू येथील हाॅटेलमध्ये तीन दिवस वेटर बनून पाळत ठेवली. त्यानंतर ताे नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल असून, पहिल्यांदाच त्याला अटक झाली.
टोळीचा सूत्रधार अँथोनी पॉल हा असून त्याच्या टोळीने अंधेरी येथे नवे कार्यालय सुरू करून भाड्याने देण्यासाठी गाड्या जमा करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण कोपरकर यांनी तिथे पाळत ठेवली. या वेळी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर येथे राहत असल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्याच्याच शेजारची खोली पोलिसांनी भाड्याने घेतली. या वेळी सहायक निरीक्षक राजेश गज्जल, लक्ष्मण कोपरकर, ऊर्मिला बोराडे व राहुल वाघ हे त्या ठिकाणी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान त्या ठिकाणी तळ ठोकून होते. ५ तारखेला तो पत्नीला भेटायला आला असता पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत मुख्य सूत्रधार अँथोनी पॉल याच्याविषयी माहिती मिळाली. पॉल हा दुबईचे मोबाइल सिम वापरून सर्वांना चकमा देत होता. ताे बंगळुरू येथे हाॅटेलमध्ये राहत असल्याचे समजले.
३०० हून अधिक गाड्या विकल्याची शक्यता
पोलिसांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ गुजरात येथे ठिकठिकाणी छापे मारून विकलेल्या चोरीच्या २० गाड्या जप्त केल्या. या टोळीने राज्यभरातून ३०० हून अधिक गाड्या चोरून गुजरात व इतर राज्यांत विकल्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे पथक सलग २५ दिवस कार्यरत होते.