नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला; जमिनीत पेरलेले २ भूसुरूंग केले नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 07:29 PM2021-02-24T19:29:13+5:302021-02-24T19:30:22+5:30
Police busted Naxalist plot : जवानांनी आगेकूच केली असता नक्षलवादी जेवण बनविण्याच्या तयारीत होते. पण पोलीस जवानांचे पथक आल्याची कुणकुण लागताच त्यांनी तेथून पळ काढला.
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलीस पथकासोबत घातपात घडविण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. जंगलात जमिनीत पेरून ठेवलेले १० किलोग्रॅमचे दोन भूसुरूंग पोलिसांनी शोधून काढत ते बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने नष्ट केले. गडचिरोली पोलीस दलासाठी हे यावर्षीचे मोठे यश ठरले आहे. ही कारवाई एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत कोकोटी जंगल परिसरात मंगळवार आणि बुधवारी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, नक्षलविरोधी अभियान पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, विशेष कृती दल व कोटमी पोलीस मदत केंद्राचे जवान मंगळवारी सकाळी कोकोटी गावाच्या उत्तरेला असलेल्या जंगलातील पहाडावर शोधमोहीम राबवत होते. त्याचवेळी पहाडी भागात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी आगेकूच केली असता नक्षलवादी जेवण बनविण्याच्या तयारीत होते. पण पोलीस जवानांचे पथक आल्याची कुणकुण लागताच त्यांनी तेथून पळ काढला.
पोलीस पथकाने त्या परिसरात पुन्हा शोध अभियान राबविले असता पहाडाच्या पूर्व दिशेला एक आणि पश्चिम दिशेला एक असे दोन इलेक्ट्रीक वायर दिसून आले. त्यामुळे बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने तपासणी केली असता नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरून ठेवलेले १० किलो वजनाचे दोन भूसुरूंग आढळले. ते जमिनीच्या बाहेर काढणे धोक्याचे असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले.
याप्रकरणी नक्षल कंपनी क्रमांक ४ चा कमांडर प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकाल वीर उर्फ पदकाला स्वामी उर्फ लोकेटी चंदर राव तसेच कसनसूर दलम कमांडर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. घातपाताचा कट उधळून लावण्याच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक गोयल यांनी कौतुक करत हे अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.
साहित्य टाकून जंगलात पळाले
ज्या ठिकाणी ही कारवाई झाली त्या ठिकाणी बऱ्याच संख्येने नक्षलवादी कॅम्प लावून होते. पण पोलीस पथक आल्याची चाहुल लागताच त्यांनी सर्व साहित्य तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यावेळी नक्षलवाद्यांच्या पिट्टू बॅग, प्लास्टिक शिट, स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, किराणा सामान, पिण्याचे पाणी, चप्पल, बूट, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्य पोलिसांच्या हाती लागले.