Nashik: पोलिसांनी नाशकातील देहविक्रय अड्डा बंद केला; पेट्रोलने पेटवून घेण्याची धमकी जुमानली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:32 PM2021-12-09T23:32:45+5:302021-12-09T23:33:18+5:30
Nashik Bhadrakali Area: भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली, तसेच संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पाठीमागील भींतीला लागून असलेल्या शिवाजीरोडलगतच्या देहविक्रयचा जुना अड्डा पोलिसांनी धाडस दाखवून बंद केला.
नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील देहविक्रयचा तो सर्वात जुना परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गल्लीतील खोल्या अखेर पोलिसांनी गुरुवारी (दि.९) धडक कारवाई राबवून कायमच्या ‘सील’ केल्या. हा सील पुन्हा तोडू नये, यासाठी परिसरात पोलिसांनी फॅब्रिकेशन कामागारांमार्फत पत्रे लावून घेत वेल्डींगदेखील करुन घेतल्याचे सांगण्यात आले.
भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली, तसेच संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पाठीमागील भींतीला लागून असलेल्या शिवाजीरोडलगतच्या देहविक्रयचा जुना अड्डा पोलिसांनी धाडस दाखवून बंद केला. यापुर्वी अनेकदा याठिकाणी छापे पडले. गुन्हे दाखल झाले; मात्र येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांना यापासून परावृत्त करत हा व्यवसाय बंद करण्यास वारंवार पोलीस अपयशी ठरले होते. काही महिन्यांपुर्वीच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नोटीस बजावून ठाकरे गल्लीतील देहविक्रय करणाऱ्यांना तातडीने स्थलांतरीत होण्याचे आदेश देत जागा मालकाला कारवाई का करु नये, अशी कारणेदाखवा नोटीसही बजावली होती. मात्र याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करणे पसंत केले गेले.
आठवडाभरापुर्वीच पाण्डेय यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६च्या कलम७ नुसार अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत त्यांनी प्रार्थनास्थळ, शैक्षणिक संस्था, वसतीगृह, रुग्णालय, नर्सिंगगृह आदी सार्वजनिक ठिकाणांपासून २००मीटरच्या अंतरापर्यंत देहविक्रय करण्यास प्रतिबंध असल्याचे घोषित केले. यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा व भद्रकाली पोलिसांनी त्यांच्या आदेशान्वये भर बाजारपेठेतील सार्वजनिक ठिकाणांना लागून असलेला देहविक्रयचा अड्डा गुरुवारी सील केला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय पवार, पोलीस निरिक्षक डॉ. अंचल मुदगल, कुंदन जाधव, दुय्यम निरिक्षक दिलीप ठाकुर सहायक निरिक्षक प्रणिता पवार यांच्या नेृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
ध्वनिक्षेपकावरुन सुचना देत ‘डेडलाईन’
यावेळी सुरुवातीला पोलिसांनी वाहनांच्या ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषणा करत महिलांना तातडीने जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आणि मर्यादित स्वरुपाचा त्यासाठी वेळ दिला. यानंतरही काही महिलांनी खोल्या सोडण्यास नकार देत असहकार्याचा पवित्रा घेतला तर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिली. यावेळी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत त्यांना समज देत त्वरित बाहेर काढले. सर्व खोल्यांची पंचांसमक्ष बारकाईने तपासणी करुन घेत खोल्या कुलुपबंद करुन घेत शासकीय पद्धतीने सील केल्या.