पोलीस आयुक्तांची ५० हजार पोलिसांवर कौतुकांची थाप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 09:11 PM2019-10-31T21:11:53+5:302019-10-31T21:16:13+5:30
निवडणूकीतील सुरळीत बंदोबस्ताबाबत बक्षीस; सेवा पुस्तकातही नोंद होणार
मुंबई - महानगरात विधानसभा निवडणूका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या ५० हजारावर मुंबईपोलिसांची पाठ आयुक्त संजय बर्वे यांनी कौतुकाने थोपाटली आहे. निवडणूकीच्या काळात कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांची चांगली कामगिरी, म्हणून सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूका किरकोळ अपवाद वगळता सुरळीतपणे पार पडल्या. आचारसंहिता लागू झाल्यापासून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या कडून विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे २१ ऑक्टोबरला मतदान व २४ ऑक्टोबरला मतमोजणी दिवशी अतिरिक्त बंदोबस्तत तैनात करण्यात आलेला होता. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील निवडणूका सुरळीतपणे पार पडल्या. त्यामुळे या कालावधीत कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांना बक्षीस देण्याचा निर्णय आयुक्त संजय बर्वे यांनी घेतला आहे. या कालावधीत गैरहजर, वैद्यकीय रजेवर असलेल्या अधिकार व अंमलदाराना चांगली कामगिरी म्हणून त्यांच्या सेवा पुस्तिकेवर (सर्विस बुक) नोंद केली जाणार आहे. त्याचा फायदा त्यांना भविष्यातील विशेष सन्मान, शौर्यपदकासाठी पाठविल्या जाणाऱ्या प्रस्तावासाठी होईल, त्याचप्रमाणे बढती व बदलीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंत संबंधित पोलीस उपायुक्तांनी बक्षीस द्यावयाची आहेत, तर पीएसआय ते वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत अप्पर आयुक्तांकडे तर सहाय्यक आयुक्तांना सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही बक्षीसे देणार आहेत, त्याबाबतची कार्यवाही त्वरित करुन कार्य अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.
गणेशोत्सव बंदोबस्ताबद्दल अद्याप बक्षीस नाही
पोलीस आयुक्तांनी गणेशोत्सव, मोहरमच्या कालावधीत पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल १६ सप्टेंबरला बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. मात्र काही सहआयुक्त, अप्पर आयुक्त व उपायुक्तांनी त्यांची कार्यवाही केलेली नाही. त्याबाबत अधिकारी-अंमलदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्त बर्वे यांची दखल घेत संबंधित अहवालाची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.