पोलीस आयुक्तांचा 'अलर्टनेस'! नागपूरच्या रस्त्यावर पकडला गेला कुख्यात गुंड
By योगेश पांडे | Published: February 27, 2024 10:07 PM2024-02-27T22:07:03+5:302024-02-27T22:07:25+5:30
मोहसिन उर्फ गुड्डू अख्तर मोहम्मद जुल्फेकार अख्तर असे गुंडाचे नाव
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अलर्टनेसमुळे नागपुरातील एक कुख्यात गुंड पकडल्या गेला. भर चौकात विनाहेल्मेटने धोकादायकपणे दुचाकी दामटणाऱ्या तरुणाला संशयावरून पोलीस आयुक्तांनी स्वत: थांबविले. त्याला ताब्यात घेतल्यावर तो गुंड असल्याची बाब समोर आली.
मोहसिन उर्फ गुड्डू अख्तर मोहम्मद जुल्फेकार अख्तर (रा. टेका, नयी बस्ती, पाचपावली) असे गुंडाचे नाव आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन पोलीस आयुक्त परतत असताना आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यान एमएच ४९ एक्स २५८९ क्रमांकाच्या दुचाकीवर दोन तरुण विनाहेल्मेट धोकादायक पद्धतीने वाहन चालवत जाताना दिसले. पोलीस आयुक्तांनी चालकाला दुचाकी गाठायला सांगितले. त्यांनी तरुणांना थांबवून विचारणा केली. त्यातील एक तरुण देहबोलीवरूनच गुंड वाटत होता. पोलीस आयुक्तांनी तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात त्याचा रेकॉर्ड तपासण्यास सांगितले. त्याच्याविरोधात आठ गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली. तो गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होताच आयुक्तांनी त्याला ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हवाली केले.