‘आनंदवन’ विरोधात पोलिसांत तक्रार; भेदभावाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:26 AM2020-06-29T02:26:17+5:302020-06-29T02:26:27+5:30
तक्रारदाराने गैरव्यवहार केल्याचे व्यवस्थापनाने दिले स्पष्टीकरण
वरोरा (चंद्रपूर) : कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी डॉ. बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपणांस हीनदर्जाची वागणूक मिळाल्याची तक्रार आनंदवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजू सौसागडे यांनी पोलिसांत दिली आहे. या तक्रारीमुळे मागील काही दिवसांपासून असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.
आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कराजगी व अंतर्गत व्यवस्थापक गौतम कराजगी यांच्याविरूद्ध या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कारणावरून घराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला, बळजबरीने घर खाली करण्यात आले. तसेच माहितीच्या अधिकारात का अर्ज केला, म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सौसागडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार मडावी यांनी सांगितले.
दरम्यान, गौतम कराजगी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. राजू सौसागडे याने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्याला व त्याच्या पत्नीस कामावरून काढून टाकले आहे. राजू हा नेहमी महारोगी सेवा समिती व आनंदवन ग्रामपंचायतीविरुध्द तक्रारी करीत असतो. अॅट्रासिटी कायद्याची धमकी देत असतो, असे कराजगी यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, राजू सौसागडे व त्याच्या कुटुंबास गावाबाहेर काढण्याचा ठराव आनंदवन ग्रामपंचायतीने विशेष सभेत मंजूर केला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली होती.
बाबांच्या काळापासून आनंदवनात जातीपातीचा भेदभाव होत नाही. सौसागडे हे संस्थेच्या तत्वाचे पालन करीत नाही. तक्रारी करून त्रास देतो. -गौतम कराजगी, अंतर्गत व्यवस्थापक, महारोगी सेवा समिती, आनंदवन