कुख्यात आबू खानविरुद्ध पोलिसांनी आवळला पाश; २४ तासांत तिसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 10:13 PM2021-08-29T22:13:59+5:302021-08-29T22:14:16+5:30
त्याच्याविरुद्ध कुणी तक्रार करण्याची हिंमत दाखवत नाहीत. दोन वर्षांपूर्वी आबूविरुद्ध शहर पोलिसांनी जबरदस्त कारवाई करून त्याचे अमली पदार्थाचे नेटवर्क मोडून काढले होते.
नागपूर : कारागृहातून बाहेर आल्यानंतर आपले गुन्हेगारी नेटवर्क सक्रिय करणारा कुख्यात गुंड फिरोज उर्फ आबू अजिज खान (वय ५०) याचे नव्याने कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी पुन्हा एक खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला.
आबू आणि टोळीविरुद्ध २४ तासांत दाखल झालेला हा तिसरा गुन्हा होय. या गुन्ह्यात आबूसोबत अक्रम, अब्दुल सत्तार, अब्दुल जब्बार असे एकूण चार आरोपी आहेत.
शिवनगर दुर्गामाता मंदिरजवळ राहणाऱ्या बबिता राजू तलमले (वय ५२) यांचा दिघोरी उड्डाणपुलाजवळ महेश बार ॲण्ड रेस्टाॅरंट आहे. आरोपी आबू खान आणि त्याचे उपरोक्त साथीदार १ ऑगस्टपासून बारमध्ये जाऊन खंडणीसाठी गोंधळ घालतात. येथे बार चालवायचा असेल तर नियमित हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून आरोपी जबरदस्तीने दारूच्या बाटल्या नेतात. विरोध केला असता आरोपींनी यापूर्वी बबिता यांचा मुलगा गाैरव, त्यांचा व्यवस्थापक आणि बारमध्ये काम करणारी माणसे या सर्वांना तलवारीचा धाक दाखवून अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आबू आणि टोळीची ताजबाग, सक्करदरा भागात प्रचंड दहशत आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कुणी तक्रार करण्याची हिंमत दाखवत नाहीत. दोन वर्षांपूर्वी आबूविरुद्ध शहर पोलिसांनी जबरदस्त कारवाई करून त्याचे अमली पदार्थाचे नेटवर्क मोडून काढले होते. दीड ते दोन वर्षे कारागृहात राहिल्यानंतर आबू जामिनावर बाहेर आला आणि त्याने पुन्हा आपली टोळी सक्रिय करून दहशत निर्माण करणे सुरू केले आहे. ते लक्षात येताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आबूकडे नजर फिरविली आहे. आबू आणि टोळीविरुद्ध पहिला गुन्हा शुक्रवारी सायंकाळी, दुसरा शनिवारी दुपारी आणि तिसरा गुन्हा शनिवारी रात्री दाखल करण्यात आला.
जागोजागी शोध, छापेमारी
आबू आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आबू आणि त्याच्या साथीदारांच्या घरी तसेच अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. मात्र, आबू किंवा साथीदार पोलिसांच्या अद्याप हाती लागलेला नाही. दरम्यान, पुढच्या काही तासांत आबूविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.