आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना पोलिसांचा दणका, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: June 24, 2023 11:09 PM2023-06-24T23:09:26+5:302023-06-24T23:16:28+5:30
गुन्हा दाखल : साेशल मीडियावर पोलिसांची नजर
लातूर : साेशल मीडियात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या चौघांना हिसका दाखवत विवेकानंद चाैक पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी नोंदविलेल्या या गुन्ह्यामुळे आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिला आहे. पाेलिस हवालदार बालाजी पंढरीनाथ जाधव (वय ४२) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून चार जणांविराेधात गुरनं. ३८३ / २०२३ कलम ५०५ (२) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे म्हणाले.
चूक करणाऱ्यांबरोबर ती पसरविणारेही गुन्हेगार...
सोशल मीडियामध्ये बऱ्याचदा आक्षेपार्ह मजकूर, व्हिडीओ तयार करून समाजकंटक पोस्ट करतात. इतर लोक कसलाही विचार न करता ती एकमेकांना फाॅरवर्ड करतात. पोस्ट तयार करणारा जितका गुन्हेगार आलेली माहिती जशास तशी माहिती पुढे पाठविणारा गुन्हेगार ठरतो. त्यामुळे कोणत्याही समाजविघातक संदेशांना फॉरवर्ड करू नका, अन्यथा गुन्हा दाखल होऊन जेलची हवा खावी लागेल. योग्य तत्परता म्हणून असे मॅसेज दिसल्याक्षणी स्वत:च्या अकाऊंटवरून डिलिट करा. तसेच वारंवार तसे मेसेज तुम्हाला येत असतील तर पोलिसांना कळवा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.