गुडविनच्या ‘अकराकरण’ बंधूंना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:11 AM2019-12-15T06:11:36+5:302019-12-15T06:11:44+5:30
आणखी चौघांना लवकरच अटक । ठाणे पोलिसांची माहिती
ठाणे : गुडविन ज्वेलर्सचे प्रमुख मालक असलेले तथा मुख्य आरोपी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघा भावंडांना शनिवारी ठाण्याच्या विशेष एमपीआयडी न्यायालयाने येत्या २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. फरार असताना त्यांनी केरळ आणि तामिळनाडू या परिसरात वास्तव्य केल्याचे सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शुक्रवारी ठाणे विशेष न्यायालयातील एमपीआयडी न्यायालयात शरण आल्यानंतर दोघांना ठाणे शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर, शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांना ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुडविन ज्वेलर्स प्रकरणातील गुन्ह्यात शनिवारी एमपीआयडी न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्यासमोर हजर केले.
या वेळी सरकारी वकील विहीत मुंढे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास करण्याबरोबर गुन्हा कसा आणि कशासाठी केला आदी बाबींच्या माहितीसाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली. त्यानंतर न्यायाधीश जाधव यांनी दोघांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात दोघांसह आणखी चार असे सहा जण आरोपी असून त्या चार जणांनाही लवकरच अटक केली जाईल. तसेच यामध्ये आणखी काही जण असण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध ठिकाणच्या पोलिसांकडेही ताबा देणार
नौपाडा पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर त्यांना डोंबिवली, शिवाजीनगर या गुन्ह्यात कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर, त्यांचा ताबा राज्यात विविध ठिकाणी दाखल असलेल्या पोलिसांकडे दिला जाईल, असे ठाणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मिळालेल्या दिवसांत त्यांच्याकडून कसून चौकशी करून अजून किती जणांची फसवणूक केली आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. या प्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.