फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:20 PM2021-06-16T17:20:38+5:302021-06-16T17:20:52+5:30
Crime News : युवतीला पळवून नेल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध लावून तिला बुधवारी घरी परत आणले.
अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका युवतीस फूस लावून पळवून नेले होते. या युवतीला पळवून नेल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध लावून तिला बुधवारी घरी परत आणले.
हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीला याच गावातील रहिवासी युवकाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणाची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेत या युवतीचा शोध सुरू केला होता. मात्र पोलिसांना शोध लागत नव्हता. त्यामुळे हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे साेपविण्यात आले. या कक्षाकडून बेपत्ता असलेल्या युवतीचा शोध सुरू करण्यात आला. एक वर्षापासून बेपत्ता असलेली ही युवती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावात असल्याची माहिती या कक्षाला मिळाली. यावरून पोलिसांनी अंबाडा गाठून या युवतीला विश्वासात घेऊन हिवरखेड येथे परत आणले. या युवतीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आतापर्यंत १४ मुलींना अशा प्रकारे परत आणले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रमुख संजीव राऊत, प्रीती ताठे, महेश गावंडे, सुलभा ढोले, विजय खर्चे, सूरज मंगरूळकर, संजीव कोल्हटकर व पूनम बचे, मुस्कान पथकाचे राकेश राठी, हर्षद देशमुख, अनिता टेकाम यांनी केली. या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.