पोलिसांनी युवकांना खांबाला बांधून दिला चोप, ग्रामस्थ म्हणाले "वंदे मातरम"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:16 PM2022-10-05T17:16:56+5:302022-10-05T17:17:56+5:30
गरबा खेळणाऱ्यांना ज्याठिकाणी मारहाण करण्यात आली होती.
वडोदरा - गुजरातच्या खेडा जिल्ह्यात मुस्लीम युवकांच्या गर्दीने सोमवारी रात्री एका मंदिरात सुरू असलेल्या गरबा नृत्य करत असलेल्या लोकांवर हल्ला केला. या घटनेत ७ भाविक जखमी झाले होते. त्यानंतर, पोलिसांनी दुसऱ्यादिवशी तपासाअंत या आरोपींचा शोध घेत १० जणांना गावात आणले. गावातील वीजेच्या खांबाला बांधून या आरोपींना गावकऱ्यांसमोर पोलिसांनी दांडक्याने मारले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
गरबा खेळणाऱ्यांना ज्याठिकाणी मारहाण करण्यात आली होती. त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींना नेऊन बदडले. यावेळी, गावकऱ्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. मातर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उंढेला गावच्या मंदिर परिसरात गरबा खेळणाऱ्या लोकांवर जवळपास १५० मुस्लीम युवकांच्या गर्दीने दगडफेक केली होती. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ४३ जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. दगडफेक करणाऱ्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन गावात आणून बदडले. त्यावेळी, आरोपींनी पोलिसांसमोर हात जोडून माफी मागितली. तसेच, उपस्थित गावकऱ्यांचीही माफी मागण्यात आली.
दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी वडोदराच्या सावली भागातील भाजीमंडईत दोन समुदायामध्ये वाद झाला होता. त्यामध्ये, ४३ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी, पोलिसांनी ४० जणांना अटकही केली होती. धार्मिक ध्वज लावण्याच्या मुद्द्यावरुन हा वाद झाला होता. त्यानंतर, दगडफेकही करण्यात आली होती.