पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:25 PM2021-05-02T19:25:22+5:302021-05-02T19:31:55+5:30

Missing Grandfather : लोकमत आणि पोलिसांमुळे अनोळखी आजोबा कुटुंबात सुखरूप पोहोचले

The police got success to get back missing grandfather to the family | पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट 

पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट 

Next
ठळक मुद्देरील अशी वाटणारी ही रियल स्टोरी नागपुरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपची कव्हर स्टोरी बनलेली आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : वृद्धत्त्वामुळे स्मरणशक्तीने दगा दिलेले ८५ वर्षीय आजोबा तीन दिवसांपासून हिंगणा मार्गावर भटकत जीवन मरणादरम्यानची लढाई लढत होते. उपाशी असल्यामुळे त्यांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता आणि तीव्र उन्हामुळे त्यांच्या जीवाची काहिली होत होती. ते रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्याला मदतीची याचना करत होते. मात्र कोरोनाच्या धाकामुळे कुणीच त्यांना मदत करीत नव्हते. ही बाब एका सद्गृहस्थाने लोकमत प्रतिनिधीला कळवली. त्यांनी डीसीपी नूरुल हसन यांना कळवले. लगेच सूत्र हलले अन या आजोबांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर पोलिसांनी त्यांचे कुटुंबीयही मिळवून दिले. रील अशी वाटणारी ही रियल स्टोरी नागपुरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपची कव्हर स्टोरी बनलेली आहे.

 


एका सद्गृहस्थाने लोकमत प्रतिनिधीला शनिवारी दुपारी ३.३० ला फोन करून अनोळखी आजोबांचा व्हाट्सएपवर फोटो पाठविला. फोन करून त्यांची दयनीय अवस्थाही सांगितली. लोकमत प्रतिनिधीने पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांना ही माहिती देऊन मदत मागितली. त्यांनी लगेच प्रतापनगरचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांना वृद्धाच्या मदतीसाठी घटनास्थळी पाठवले. ठोसरे तसेच त्यांचे सहकारी किशोर इंगळे, विशाल गुडे, संजय वानेरे आणि गजानन पवार यांनी अनोळखी आजोबांना मदतीचा हात देऊन मेडिकलमध्ये पोहोचवले. त्यांना वृद्धत्वामुळे स्मरणशक्तीची समस्या असल्याने आपले नाव व पत्ता सांगता येत नव्हता. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या अनोळखी आजोबांवर मेडिकलमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दुसरीकडे पोलिसांनी आजोबांची ओळख पटविण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तीची यादी शोधली. त्यातून धागा मिळाला. वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मिसिंग कंप्लेंट वरून त्यांच्या घरच्यांना संपर्क करण्यात आला आणि अनोळखी आजोबांची ओळख पटली. त्यांचे नाव शंकरराव महादेवराव इंगोले असल्याचे स्पष्ट झाले. ते वाडी कंट्रोलमध्ये राहतात. पोलिसांनी लगेच इंगोले परिवाराशी संपर्क करून त्यांना बोलवून घेतले. फोटो वरून ओळख पटविल्यानंतर त्यांचे दोन्ही मुले आणि इतर नातेवाईक रविवारी दुपारी मेडिकलमध्ये पोहोचले. तेथून त्यांनी शंकरराव यांना ताब्यात घेऊन आपल्या घरी नेले.

भरल्या कंठाने आभार शंकरराव निवृत्त रेल्वे पोलिस कर्मचारी होय. त्यांना इंद्रकुमार आणि नंदू ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. सगळ्यांचे लग्न झाले असून त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे. ते २९ एप्रिलला घरून निघून गेले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांना सारखे शोधत होते. आज दुपारी पोलिसांनी शंकराव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणल्यानंतर कुटुंबीय ओक्साबोक्शी रडले. लोकमत मुळे तुमचे वडील मिळाल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर इंद्रकुमार यांनी फोन करून भरल्या कंठाने लोकमतचे आभार मानले.

सोशल मीडिया मीडियावरही कौतुक शनिवारी दुपारी अनोळखी आजोबा आणि पोलिसांच्या तत्परतेची स्टोरी लोकमत प्रतिनिधीने व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. तेव्हापासून सोशल मीडियावरही लोकमत तसेच पोलिसांवर अनेकांनी प्रशंसा केली.

Web Title: The police got success to get back missing grandfather to the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.