‘कूपर’मध्ये रंगले चोर-पोलिस नाट्य, पोलिसांना गुंगारा देण्याचा कैद्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 06:41 AM2023-04-07T06:41:39+5:302023-04-07T06:42:01+5:30
कैदी तौफिक शेख सहाव्या मजल्यावरून खालच्या दिशेने पळून गेला पण...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कूपर रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी आणलेल्या सराईत गुन्हेगाराने सुरुवातीला बेडी टोचत असल्याचे सांगून पोलिसाला ती सैल करण्यास भाग पाडले. पुढे थंडी भरल्याचा बनाव करत अंगावर बेडशीट ओढून, हातातील बेडी सोडून पळ काढला. यादरम्यान एखादया चित्रपटातील दृश्याप्रमाणे कूपर रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यापासून आवारापर्यंत चोर पोलिसांमध्ये थरारक पाठलाग रंगला होता. आरोपीने पोलिसांना मारहाण करत त्यांच्या दिशेने दगडफेकही केली. यादरम्यान, झालेल्या झटापटीत दोन पोलिस जखमी झाले. अखेर अर्ध्या तासाने त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.
विलेपार्ले पोलिस ठाण्यातील लुटीच्या गुन्ह्यातील आरोपी तौफिक शेख (२९) याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. पोलिस हवालदार सुयोग्य वैद्य (५३) यांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. शेखची एमआरआय चाचणी करायची असल्याने, सहकारी पोलिस महाले रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या एमआरआय ऑफिसमध्ये चौकशी करण्यासाठी गेले. यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास शेखने त्याच्या हातातील बेडी टोचत असल्याचे सांगितल्याने पोलिसाने ती थोडी सैल केली. त्यानंतर, शेखने थंडी वाजत असल्याचे सांगून अंगावर बेडशीट ओढून घेतली. बेडशीट खाली हळूहळू बेडी काढून टाकली. वैद्य यांना काही समजण्याच्या आधीच अंगावरील बेडशीट त्यांच्यावर फेकून शेखने पळ काढला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुकी केली. झटापटीत त्यांच्या गणवेशावरील बॅच ओढून खाली फेकला.
तद्दन फिल्मी...
कैदी तौफिक शेख सहाव्या मजल्यावरून खालच्या दिशेने पळून गेला. वैद्य यांनी याबाबत अन्य सहकाऱ्यांना कळवले. काही पोलिसांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फिल्डिंग लावली. त्याचदरम्यान शेख रुग्णाच्या नातेवाईकांच्या विश्रांतीसाठी असलेल्या जागेच्या दिशेने पळताना दिसला. वैद्य आणि महाले यांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला होता. बाहेर येताच, शेखने दोघांना दगड मारण्यास सुरुवात केली. “कोई सामने आएगा तो मैं किसीको जिंदा नही छोडूंगा” असे सांगितले. मात्र, त्यांनी अखेर त्याला पकडलेच. जवळपास अर्धा तास हा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग सुरु होता. शेखला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.