रिक्षाचालकाला केली शिवीगाळ; मुजोर पोलिसाला ५० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:12 PM2019-05-18T18:12:23+5:302019-05-18T18:20:54+5:30
जगदिश पाटील असं या पोलीस शिपायाचे नाव असून तो विरार पोलीस ठाण्यात नोकरी करत आहे.
मुंबई - राज्य मानवी हक्क आयोगाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयाने सामान्य नागरिकांसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसाला अद्दल घडली आहे. रिक्षाचालकाला शिवीगाळ करणाऱ्या पोलीस शिपायाला आयोगाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जगदिश पाटील असं या पोलीस शिपायाचे नाव असून तो विरार पोलीस ठाण्यात नोकरी करत आहे.
विरार परिसरातील रिक्षाचालक रमेश पाटील यांचा एका प्रवाशासोबत वाद झाल्यामुळे पोलिसांनी त्यांचा परवाना जप्त केला होता. ५ एप्रिल २०१७ रोजी रमेश त्यांचा जप्त केलेला वाहन चालक परवाना परत घेण्यासाठी विरार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस शिपाई जगदिश पाटील याने त्यांना आई - बहिणीवरून शिवीगाळ केली. शिव्या देतानाचा हा सर्व प्रकार रमेश यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. पोलीस शिपाई जगदिश पाटील यांनी केलेल्या शिवीगाळबाबत रमेश यांनी विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली. मात्र, काही वरिष्ठ पोलिसाने काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे शेवटी न्याय मिळवण्यासाठी रमेश यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. तसेच जगदिश पाटीलने शिवीगाळ करतानाची व्हिडीओ क्लीप देखील आयोगाला सादर केली.
राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस शिपाई जगदिश पाटील यांचे वर्तन पोलीसाला वर्दीला शोभत नाही. हे कृत्य निर्लज्जपणाचे आहे. तक्रारदाराची चूक नसताना त्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे ते नूकसान भरपाईस पात्र आहेत. असे म्हणत रिक्षाचालक रमेश यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सईद यांनी पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. ही नुकसान भरपाईची रक्कम जगदिश पाटील याच्या पगारातून कापून घ्यावी आणि जगदिश पाटील यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी असे देखील आदेश मानवी हक्क आयोगाने दिले आहेत.