बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Published: August 17, 2018 08:58 PM2018-08-17T20:58:58+5:302018-08-17T20:59:45+5:30
दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून भामट्यांनी घेतले बँकांकडून लाखोंचे कर्ज
मुंबई - मोटार सायकल खरेदी करण्यासाठी कर्ज घेतल्याप्रकरणी पवईत राहणाऱ्या योगेश भाटिया (वय - ३६) यांना १८ मे रोजी एचडीएफसी बँकेकडून नोटीस आली. मात्र, योगेश यांनी मोटार सायकल खरेदीकरिता कर्ज घेतले नसून योगेशच्या नावे नालासोपाऱ्यातील पत्त्यावर बनावट कागदपत्र बनवून त्याआधारे कोटक बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स, फुलर्टन, ए. ऑन क्रेडिट, एचडीएफसी बँक, रत्नाकर बँक लिमिटेड, एल अँड टी फायनान्स, कॅपिटल फस्ट आदींकडून कर्ज घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर या बड्या बँकांकडून आपल्या नावे घेतलेले कर्ज आपल्या माथी पडेल या तणावाखाली असलेल्या आणि धक्का बसलेल्या योगेश भाटियाने याबाबत पवई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अथक परिश्रम करत याप्रकरणी डोंबिवली येथील दावडी गावातून डेरिक नोरोन्हे (वय ३७), प्रवीण नोरोन्हे (वय - ४१) आणि सावेर नोरोन्हे (वय - ४५) या तिघांना बेड्या ठोकण्यास यश लाभले आहे.
योगेशला १८ मे रोजी एचडीएफसी बँकेने नोटीस पाठवून बँकेकडून त्याने मोटार सायकल खरेदी करताना बँकेतून लोन घेते असून त्याचे थकीत हप्ते असल्याचे त्या नोटिशीत नमूद केले होते. तसेच हप्ते भरले नसल्याने त्याचे बँक खाते गोठवून ६ हजार ४२ रुपये काढून घेतले असल्याचे नोटिशीत स्पष्ट केले होते. मात्र योगेशने कोणतीही मोटारसायकल विकत घेतली नसून बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नव्हते. त्यानंतर योगेशने या नोटिशीबाबत पवई हिरानंदानी येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत चौकशी केली. त्यावर योगेशला नालासोपारा पश्चिम येथील पत्त्यावर योगेशच्या नवे कर्ज घेतल्याचे उघड झाले. मात्र, योगेश नालासोपाऱ्यात कधीच राहत नव्हता. याबाबत बँकेला कळवून त्याने ऑनलाईन सीआयबीआयएल या साईटवरून स्वतःच्या पॅनकार्डवर किती कर्ज याबाबत योगेशने पडताळणी केली. त्यानंतर त्याच्या नावे वेगवेगळ्या कंपन्यांचे बोगस सिमकार्ड घेतले असून कोटक बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स, फुलर्टन, ए. ऑन क्रेडिट, एचडीएफसी बँक, रत्नाकर बँक लिमिटेड, एल अँड टी फायनान्स, कॅपिटल फस्ट आणि कर्ज देणाऱ्या खाजगी कंपन्यांपासून कर्ज घेतले आणि कर्जाची मागणी केलेली असल्याचे उघड झाले. योगेशच्या नावे नालासोपारा, पालघर, ठाणे, कांदिवली या ठिकाणचे बोगस पत्ते नोंद असल्याची देखील खळबळजनक माहिती उघडकीस आली. त्यामुळे योगेशच्या पायाखालची जमीनच सरखली आणि त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याच्या तपासाअंती योगेशची बनावट कागदपत्रे बनवून आणि बँकांची फसवणूक करणाऱ्या डेरिक नोरोन्हे (वय ३७), प्रवीण नोरोन्हे (वय - ४१) आणि सावेर नोरोन्हे (वय - ४५) या तिघांना डोंबिवलीतील दावडी गावातील ओम साई इंटरप्राईज या ठिकाणाहून सापळा रचून पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून योगेश भाटिया नावाचे कागदपत्रे तसेच इतर इसमांच्या नावाचे पॅनकार्ड, भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधार कार्ड आई वेगवेगळ्या बॅंकांचे कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत. भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.