सामूहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेल्या ‘अत्याचाराच्या’ पाच क्लिप लागल्या पोलिसांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 06:40 AM2021-09-26T06:40:39+5:302021-09-26T06:41:20+5:30

अन्य आरोपींचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे.

Police have seized five clips of which are important evidence in a gang rape case dombivali pdc | सामूहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेल्या ‘अत्याचाराच्या’ पाच क्लिप लागल्या पोलिसांच्या हाती

सामूहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेल्या ‘अत्याचाराच्या’ पाच क्लिप लागल्या पोलिसांच्या हाती

Next
ठळक मुद्देअन्य आरोपींचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे

डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिप तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. पाचही व्हिडिओ मोबाइलमधून शोधण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर काही आरोपींनी व्हिडिओ क्लिप मोबाइलमधून डिलिट केल्याने ते परत मिळविण्यासाठी त्यांचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, व्हिडिओ क्लिप मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांचे मोबाइल स्विच ऑफमुळे त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक करणे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. 

१५ वर्षीय पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात ३३ जणांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, शुक्रवारपर्यंत २९ आरोपींना अटक केली आहे. चार आरोपी अद्याप फरार आहेत. गुरुवारी अटक केलेल्या २३ पैकी दोन आरोपी अल्पवयीन होते. त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधारगृहात केली आहे. तर उर्वरित आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत तर सहा आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, पाच व्हिडिओ क्लिपबाबत सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

पीडिता घरी परतली, पण नातेवाइकांकडे आसरा
मानपाडा पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल होण्याआधी बुधवारी दुपारीदेखील तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने कळवा येथील ठाणे महापालिका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. प्रकृती सुधारल्याने तिला शुक्रवारी संध्याकाळी घरी सोडण्यात आले. तिच्यासह तिच्या कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी तिच्या घरी जाऊन भेटही घेतली, तर पीडितेच्या कुटुंबाने बदनामीच्या भीतीपोटी नातेवाइकांकडे आसरा घेतल्याची चर्चा आहे.  

स्थानिक पोलीस चौकशीपासून दूर
या प्रकरणात विशेष महिला तपास अधिकारी म्हणून ठाणे विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांची नेमणूक केली आहे. अटक आरोपींची चौकशी दस्तुरखुद्द त्या स्वत: करीत असून, त्यांच्या मदतीला एक पोलीस हवालदार देण्यात आला आहे. स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आरोपींचा शोध सुरू असून, आरोपींचा जाबजबाब नोंदविणे तसेच चौकशी करणे याची जबाबदारी मात्र ढोले यांच्यावर आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना या चौकशीपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. 

पोलीस येणार असल्याचे कळताच आरोपीचे पलायन 
चार फरार आरोपींपैकी एकाला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक शुक्रवारी मध्यरात्री गेले असता, त्याच्या घराचा दरवाजा सताड उघडा असल्याचे दिसून आले. त्याच्या घरात कोणीही नव्हते. त्याच्या आईवडिलांचे निधन झाल्याने तो एकटाच राहत होता. परंतु,  गुन्ह्यात आरोपी म्हणून त्याचे नाव असल्याचे तसेच त्याला पकडण्यासाठी पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच त्याने घरदार उघडे टाकून पलायन केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

भोपरवासीयांचा मोर्चा
बलात्कार प्रकरणात काही वृत्तपत्रांमध्ये भोपरचा उल्लेख झाल्याने गावाची बदनामी झाल्याचे सांगून भोपरवासीयांनी शनिवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून नाराजी व्यक्त केली. परंतु, गावाबाबत आमच्याकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही, असे पोलिसांनी संतप्त नागरिकांना सांगितले. या मोर्चात राजकीय पदाधिकारी तसेच गावातील पुढाऱ्यांचा सहभाग होता.

महिला वकिलाने घेतले घटनेतील १९ आरोपींचे वकीलपत्र
डोंबिवलीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र कोणीही वकिलांनी घेऊ नये, असे आवाहन फौजदारी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले असताना या प्रकरणातील अटक आरोपींपैकी १९ आरोपींचे वकीलपत्र महिला वकील ॲड. तृप्ती पाटील यांनी घेतले आहे. 

न्यायालय जोपर्यंत आरोपींना दोषी ठरवीत नाही, तोपर्यंत सर्व निर्दोष असतात; परंतु या प्रकरणात काही जण दोषी असतीलही; पण काही निष्पाप मुलांनाही गोवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. अशा निष्पाप मुलांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहीन. त्यामुळे मी वकीलपत्र घेतले आहे, असे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Police have seized five clips of which are important evidence in a gang rape case dombivali pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.