पोलिसांचा खबरी निघाला गोळीबार प्रकरणातील आरोपी: पाच लाखांमध्ये दिली होती सुपारी
By जितेंद्र कालेकर | Published: December 2, 2019 08:39 PM2019-12-02T20:39:46+5:302019-12-02T20:47:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पाच लाखांची सुपारी घेऊन कल्याण येथील केबल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पाच लाखांची सुपारी घेऊन कल्याण येथील केबल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अब्दुल कादीर पटेल ऊर्फ मुन्ना (३३, रा. दूधनाका, कल्याण) या आणखी एका सातव्या आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. यातील सहा आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.
अब्दुल कादीर याचा कल्याणच्या दूधनाका परिसरात चिकनपुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यानेच हल्लेखोर निहाद करेल याला ५० हजारांमध्ये पिस्तूल विकले होते. याच पिस्तूलने मुन्वर शेख आणि इर्शाद कुरेशी या दोघांनी गोळीबार केल्याचे तपासात समोर आले. मुन्ना याचे ठाणे आणि मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयांमध्ये वेगळे वलय आहे. त्यामुळेच तो गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांकडे ‘खबरी’ म्हणूनही काम करीत होता. बड्या अधिका-यांकडे आपली ऊठबस असल्यामुळे कोणी आपल्याला हात लावणार नाही, असाही समज त्याच्यामध्ये होता. त्याला अटक केल्याने ठाण्यातील अशा अनेक खब-यांचे धाबे दणाणले आहेत.
हल्लेखोरांपैकी एक इस्माईल मांडेकर याच्या बहिणीला पैशांसाठी मुद्दसर ऊर्फ गुड्डू मसजिद (३९, रा. बाजारपेठ, कल्याण) याने मारहाण केल्याने इस्माईल या मेहुण्यानेच निहाद करेल याला सुपारी दिल्याचेही यात स्पष्ट झाले. कल्याणमधील बाजारपेठ भागातील व्यापारी मुद्दसर यांच्यावर २९ आॅक्टोबर २०१९ रोजी वालधुनी येथे मोटारसायकलने आलेल्या दोघांनी पिस्तूलमधून दोन राउंड गोळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जे.डी. मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम आणि पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने मुन्वर याच्यासह इर्शाद कुरेशी (२८, रा. राबोडी, ठाणे), शैबाज पोके (२४), अफताब शेख (१९), निहाद करेल (२८, तिघेही रा. कोनगाव, भिवंडी) आणि इस्माईल मांडेकर ऊर्फ बाबा (२९, रा. कल्याण) या सहा जणांना अटक केली. यातील मुन्वर आणि इर्शाद या दोघांनी पिस्टलमधून गोळीबार केल्याचे तपासात उघड झाले. हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल खरेदीसाठी निहाद याला मेहुण्याचा काटा काढण्यासाठीच इस्माईल याने आर्थिक मदत केली. दरम्यान, मुन्ना याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.