पोलिसांच्या बेजबाबदारपणा! दोन तरुण-तरुणींना मारहाण; ३ दिवसांनी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 07:25 PM2021-08-04T19:25:49+5:302021-08-04T19:28:15+5:30
Crime News :उल्हासनगर मलंगगड परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या, तरुणीचा विनयभंग
सदानंद नाईक
उल्हासनगर : निसर्गरम्य मलंगगड परिसरात रविवारी फिरण्यास गेलेल्या दोन तरुण व तरुणींना ६ जणांच्या टोक्याने अडवून मारहाण केली. तसेच तरुणीने तोकडे कपडे घातल्याचे सांगत कपडे फाडण्याचे वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. नेवाळी पोलीस चौकीवर तक्रार गेलेल्या तरुण-तरुणीला पोलिसांनी मेमो देऊन प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात मेडिकल करण्याचा सल्ला दिला असून अखेर तीन दिवसांनी मंगळवारी ६ जनावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निसर्गरम्य परिसरात नागरिक फिरायला जातात. डोंबिवली येथील राहणारे उच्चशिक्षित असलेले दोन तरुण-तरुणी रविवारी मलंगड येथील कुशिवली गाव परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळच्या सुमारास ६ जणांच्या गावगुंड टोळक्यांनी तरुण-तरुणीला अडवून तोकडे कपडे घातले म्हणून जबर मारहाण केली. तसेच तरुणीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. याप्रकारने प्रचंड घाबरलेल्या तरुणांनी कशीबशी सुटका करून नेवाळी नाका पोलीस चौकी गाठली. झालेला प्रकार पोलिसांना सांगितल्यावर, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता, तरुण-तरुणींच्या हातात मेमो देऊन प्रथम मेडिकल करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयास जाण्यास सांगितले. प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या तरुण-तरुणींनी मध्यवर्ती रुग्णालय ऐवजी घर गाठले.
सोमवारी तरुण-तरुणी यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र यावेळीही पोलिसांनी तक्रार न नोंदविता प्रथम मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन मेडिकल करण्याचा सल्ला दिला. अखेर वैतागलेल्या तरुणांनी झालेल्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केल्याने, एकच खळबळ उडाली. त्यानंतर हिललाईन पोलिसांनी मंगळवारी तरुण तरुणीला बोलावून ६ जणा विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच टोळक्याच्या शोधासाठी २ पथके स्थापन केली. तरुण-तरुणींनी मेडिकल करून हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रात दाखल करायला हवी होती. त्यांच्या विलंबामुळे गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्याचे पोलिसाचे म्हणणे आहे.
तरुण-तरुणीचा पोलीस कारभारावर टिका
पोलीसकडे मदत मागण्यासाठी गेलेल्या सोबत, पोलिसांचे असे वर्तन असेलतर सामान्य नागरिकांनी कुठे जावे? असा संताप तरुण-तरुणींनी व्यक्त केला. आम्हच्या जीवाचे बरे वाईट व्हायला हवे होते का? त्यानंतरच पोलिसांना जाग आला असता का? असे अनेक प्रश्न तरुण-तरुणीने व्यक्त केला. याप्रकारने सर्वस्तरातून संताप व्यक्त होत असून गावगुंडासह संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.