मानपाड्यातील पोलीस लॉकअप झाले फुल्ल; कोठडीत केवळ बलात्कारातील आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 05:46 AM2021-09-26T05:46:43+5:302021-09-26T05:48:20+5:30
अन्य आरोपींना ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. एका लॉकअपमध्ये प्रत्येकी सहा-सात आरोपी.
प्रशांत माने
डोंबिवली : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या तब्बल ३३ आरोपींपैकी दोन अल्पवयीन आरोपी वगळता अन्य २६ आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. एखाद्या फौजदारी गुन्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोपी असल्याची ही पहिलीच घटना आहे. या पोलीस ठाण्यात केवळ चार लॉकअप असून एका लॉकअपमध्ये प्रत्येकी सहा-सात आरोपी ठेवल्याने अन्य गुन्ह्यांमधील आरोपींना ठेवण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे सध्या तरी येथील लॉकअप फुल्ल झाल्याची चर्चा आहे.
अन्य गुन्ह्यांचा तपास थंडावला
सामूहिक बलात्काराच्या तपासकामी मानपाडा पोलीस ठाण्याची संपूर्ण यंत्रणा व्यस्त झाल्याने अन्य गुन्ह्यांचा तपास थंडावल्याचीही चर्चा आहे. सध्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या चारही लॉकअपमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीच असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
बलात्कार प्रकरणातील अटक आरोपींना ठेवण्यासाठी मानपाड्यातील लॉकअप पुरेसे आहेत का, आरोपींची संख्या पाहता त्यांना शहरातील अन्य पोलीस ठाण्यांमधील लॉकअपमध्ये ठेवले जाईल, याबाबत चर्चा होती. परंतु, या सर्वांना चौकशीकामी सोयीचे व्हावे यासाठी येथील चार लॉकअपमध्येच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपींना घरचे जेवण नाकारण्यात आले असून, तीन दिवसांपासून त्यांना कपडेही बदलायला दिलेले नाहीत, अशी तक्रार आरोपींच्या नातेवाईकांनी केली.