पोलिसांनी केली डबल रिकव्हरी..चोरलेले तीन मोबाईल अन् पाच बाईक जप्त!
By रवींद्र देशमुख | Updated: March 10, 2023 18:13 IST2023-03-10T18:13:27+5:302023-03-10T18:13:55+5:30
खबऱ्याने अचूक माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी केली डबल रिकव्हरी..चोरलेले तीन मोबाईल अन् पाच बाईक जप्त!
सोलापूर : सोलापुरात पोलिसांना डबल रिकव्हरी करण्यात यश आले आहे. चोरलेले तीन मोबाईल विकण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी मोबाईल तर जप्त केलेच, शिवाय पाच बाईकही ताब्यात घेतल्या. खबऱ्याने अचूक माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
गोविंद शामराव काळे ( वय ३५, रा. बीबी दारफळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आरोपीच्या मागावर असताना गुन्हे शाखेचे सपोनी संदीप पाटील यांना आरोपी गोविंद काळे यांची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी खात्री करत काळे याला विमानतळ परिसरात चोरीचे मोबाईल विकण्यासाठी थांबलेला असताना पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने साथीदाराच्या मदतीने अक्कलकोट रोडवरील एका घरात चोरी केल्याचे कबूल केले.
दरम्यान, त्याच्याकडून दोन लाख ८५ हजारांचे तीन मोबाईल, पाच मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. यात एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील तीन मोबाईलचे व तीन मोटार सायकल चोरीचे असे एकूण सहा गुन्हे व जोडभावी पेठ व पुणे येथील राजगड पोलिस ठाणे येथिल एक गुन्हा उघडकीस आला आहे.