मुंबईमधील ‘त्या’ पोलिसाला होणार अटक, मुंबई पोलीस आयुक्तांना दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 01:17 AM2020-07-08T01:17:48+5:302020-07-08T01:18:07+5:30
ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे पाचपाखाडीतील एका रहिवाशाकडून पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बॉटल्यांचा बॉक्स घेतल्याप्रकरणी अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी सापळा रचून अत्यंत नाट्यमयरित्या ५ जुलै रोजी अटक केली होती.
ठाणे : कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे क्वॉरंटाईन केलेल्या मुंबईच्या साकीनाका वाहतूक शाखेतील पोलिसाने चक्क ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथील वाहनचालकांकडून खंडणी उकळल्याची बाब रविवारी समोर आली. याप्रकरणाची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली असून त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे पाचपाखाडीतील एका रहिवाशाकडून पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बॉटल्यांचा बॉक्स घेतल्याप्रकरणी अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी सापळा रचून अत्यंत नाट्यमयरित्या ५ जुलै रोजी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाऱ्याची टोपी, पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बाटल्यांचा एक बॉक्स असा मुद्देमालही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने हस्तगत करून त्याला अटक केली असून मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडिक याच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महाडिक याला क्वॉरंटाईन केले होते. त्यामुळे कळवा पोलिसांनी त्याला तूर्त नोटीस बजावली आहे. क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करून अटकही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.