पार्किंगच्या वादात पोलिसाला मार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:32 AM2018-11-06T06:32:12+5:302018-11-06T06:32:24+5:30
दुचाकी पार्किंगच्या वादात पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याची घटना नायगावमध्ये घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : दुचाकी पार्किंगच्या वादात पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याची घटना नायगावमध्ये घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वरळीतील रहिवासी असलेले पोलीस शिपाई सूरज कांबळे हे नायगाव पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढनकर यांच्या वाहनावर चालक आहेत. २ नोव्हेंबरला साप्ताहिक सुट्टी असल्याने, सूरज हे सायंकाळी पोलीस मित्र प्रवीण कांबळेंसह दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडले. मित्राचे भाओजी नायगावच्या लोकसेवा संघ हायस्कूल येथे भेटणार असल्याने, दोघे बाइकवरून तेथे पोहोचले. तेथे दुचाकी पार्क केली. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दुचाकी हटविण्यास सांगितली. त्यांनी दुचाकी बाजूला करूनही ती व्यक्ती शिवीगाळ करत होती. जाब विचारताच त्या व्यक्तीने कांबळे यांना मारहाण सुरू केली. दरम्यान, आणखी दोघे तेथे आले आणि त्यांनीही मारहाण केली.