9 कोटींच्या बिटकॉइन्ससाठी पोलिस अधिकारी बनला गुन्हेगार, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:28 PM2022-01-31T12:28:56+5:302022-01-31T12:29:08+5:30
जयपूरच्या एका व्यक्तीकडे 9 कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन होते, पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने त्या व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील 30 बिटकॉइन घेतले.
नवी दिल्ली: सध्या बिटकॉइन या आभासी चलनाची सर्वत्र चर्चा आहे. या बिटकॉइनच्या गुंतवणुकीतून लोक लाखो-करोडो रुपये कमवत आहेत. दरम्यान, याच बिटकॉइनसाठी एक पोलिस अधिकारी गुन्हेगार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील एका पोलिस उपनिरीक्षकाने 9 कोटी रुपयांच्या बिटकॉइनसाठी एका व्यक्तीचे अपहरण केले.
सविस्तर माहिती अशी की, जयपूरच्या एका व्यक्तीकडे 9 कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन होते. सोनपतचा सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) शिव कुमारला ही गोष्ट कळाली. त्याने पोलिस कर्मचारी मोनू आणि तीन साथीदारांच्या मदतीने त्या व्यक्तीचे जयपूरमधून अपहरण केले आणि त्या धमकावून त्याच्याकडील 30 बिटकॉइन त्याच्या मोबाइलवरुन दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. आता या प्रकरणी सिरसा पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रहिवासी शशिकांतच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील तपासासाठी पोलिसांना जयपूरला पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शशिकांत हा स्वतः फरारी गुन्हेगार आहे. त्याच्यावर 2013 मध्ये सिरसा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटकही करण्यात आली होती.
असे केले अपहरण
शशिकांतने सांगितले आहे की, तो डिजिटल क्रिप्टोकरन्सीची कामे करतो. त्याची एएसआय कुमार आणि मोनू यांच्याशी आधीची ओळख आहे. त्याने सांगितले की, 22 जानेवारीला तो जयपूरमध्ये त्याचा मित्र गौरवच्या फ्लॅटवर असताना दोन पोलीस काळ्या रंगाच्या एसयूव्ही कारमध्ये त्यांच्या साथीदारांसह आले. त्यानंतर त्यांनी आम्हा दोघांचे अपहरण करुन खरखोडा पोलिस ठाण्यात नेले. मात्र तेथील पोलिसांनी त्याला बेकायदेशीर कोठडीत ठेवता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला एका फार्महाऊसमध्ये ओलीस ठेवले आणि बिटकॉइन घेतले. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.