उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित पोलीस अधिकारी 'भ्रष्टाचार'प्रकरणी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:29 PM2021-09-06T13:29:48+5:302021-09-06T13:30:40+5:30
सर्वेश राणा यांनी एका सराफ व्यावसायिकाकडे दबाव टाकून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. सराफाने 20 हजार रुपये दिल्यानंतरही पोलीस निरीक्षकाने आणखी पैसे मागितले.
उन्नाव - गेल्याच महिन्यात देशाच्या स्वातंत्र्यदिनी गृह मंत्रालयाने उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविलेल्या पोलीस निरीक्षकावर भ्रष्ट्राचारप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. सराफ व्यावसायिकाकडे दबाव टाकून 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी त्यांना निलंबित केलं आहे. सर्वेश राणा असं या पोलीस निरीक्षकाचे नाव असून 21 दिवसांपूर्वीच 15 ऑगस्ट रोजी त्यांना उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
सर्वेश राणा यांनी एका सराफ व्यावसायिकाकडे दबाव टाकून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. सराफाने 20 हजार रुपये दिल्यानंतरही पोलीस निरीक्षकाने आणखी पैसे मागितले. त्यामुळे, सराफाने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी थेट आमदार अनिल सिंह यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, आमदार सिंह यांनी थेट पोलीस अधीक्षकांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर, एसपी अविनाश पांडेंनी सर्वेश राणा यांना निलंबित केले. तसेच, राणा कार्यरत असलेल्या असोहा पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करुन तुरुंगातही टाकले.
सहरवा गावातील संतोष यांचे सुपुत्र सोनू यांनी याबाबत सांगितले की, असोहा ठाणे अंतर्गत बेलौरा गावात त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकान बंद करुन गावाकडे निघाले होते. तेव्हा, रानीपूर वळणावरील रस्त्यातच पोलीस निरीक्षक सर्वेश राणा यांनी त्यांची कार थांबवली. तसेच, चोरीचा माल खरेदी करता का, असे म्हणत दरोड्याचा गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकेन अशी धमकी दिली. त्यावर, सोनूने असं काहीही करत नसल्याचं म्हणताच, राणा यांनी शिवीगाळ करत तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे सोनू यांनी माफी मागत सोडून देण्याची विनंती केली. त्यावेळी राणा यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, 20 हजार रुपये देऊन तेव्हा वेळ भागवून दिल्याचे सराफाने म्हटले.