'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडाला पळवणारा 'तो' पोलीस अधिकारी चकमकीत जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:16 PM2019-01-04T19:16:47+5:302019-01-04T19:17:47+5:30
तोंडानेच 'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडांना पळवून लावल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले उत्तर प्रदेश पोलीस खात्यातील अधिकार चकमकीत जखमी झाले आहेत.
लखनौ - तोंडानेच 'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडांना पळवून लावणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी बराच व्हायरल झाला होता. मनोज कुमार असे नाव असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने बंदूक जाम झाल्यानंतर दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुकही झाले होते. दरम्यान संभल येथील पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले मनोज कुमार हे शुक्रवारी झालेल्या एका चकमकीत जखमी झाले आहेत.
या चकमकीनंतर पोलिसांनी अलियानेकपूर येथून सद्दाम या कुख्यात गुंडाला अटक केली आहे. सद्दाम हा लूट, चोरी आणि हत्येचा प्रयत्न अशा 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. सद्दाम हा आपला सहकारी अक्रम याच्यासोबत असमोली येथे जात असताना सद्दामला पोलिसांनी हटकले. त्यावेळी सद्दाम आणि त्याच्या सहकाऱ्याने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात मनोज यांच्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले. पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत सद्दामच्या पायात गोळी लागली. तर अक्रम फरार झाला.
सद्दाम याच्याकडून पोलिसांनी देशी कट्टा, काडतूस आणि एक चोरलेला मोबाइल जप्त केला आहे. तसेच त्याच्याविरोधात भादंवि कलम 307, 411 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी संभल येथे एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी, अचानक पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदुक बिघडली. ही बंदुक जाम झाल्याने त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ढिश्शक्याव ढिश्शक्याव.. असा आवाज करत या गुंडांना पाठलाग केला होता. शुक्रवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. नेटीझन्सकडून सोशल साईटवर शेअर केला जात होता.