लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:07 PM2023-04-12T22:07:47+5:302023-04-12T22:08:55+5:30

कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड आणि तब्बल २५ तोळे सोनं पथकाच्या हाती लागले. बुधवारी सकाळी जालना शहरात ही कारवाई करण्यात आली.

Police officer ran away after throwing away the bribe money, was chased and taken into custody; 9 lakhs cash, 25 tola gold seized | लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त

लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त

googlenewsNext

जालना : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याचा संशय येताच एका फौजदाराने घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या फोजदाराने लाचेची रक्कम रस्त्यातच फेकून दिली. मात्र या पळून जाणाऱ्या फौजदाराला एसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यावेळी कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड आणि तब्बल २५ तोळे सोनं पथकाच्या हाती लागले. बुधवारी सकाळी जालना शहरात ही कारवाई करण्यात आली.

गणेश शेषराव शिंदे असे लाच घेणाऱ्या फौजदाराचे नाव आहे. तक्रारदारास जालना शहरातील कदीम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात कलम ११० ऐवजी १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार गणेश शिंदे याने एक लाख रूपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पथकाने बुधवारी सकाळी जालना येथील कदीम पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. फौजदार शिंदे याने लाचेची मागणी करून ७५ हजार रूपये घेतले. परंतु, एसीबीच्या सापळ्याचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह शिंदे याने कारमधून पळ काढला. पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून शिंदे याला ताब्यात घेतले. 
यानंतर, त्याच्या कारची तपासणी केली असता घेतलेली लाचेची रक्कम वाटेत फेकून दिल्याचे समोर आले. पंचासमक्ष कारची तपासणी केली असता आतमध्ये ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड व तब्बल २५ तोळे सोने आढळून आले. संबंधित मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोनि. नंदकिशोर क्षीरसागर यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नंदकिशोर क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. 

घराचीही झाडाझडती
फौजदार शिंदे राहत असलेल्या जालना शहरातील घराची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून झाडाझडती करण्यात आली. त्या घरामध्ये काही सापडले नसल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. तर हिंगोली जिल्ह्यातील घराची झाडाझडती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Police officer ran away after throwing away the bribe money, was chased and taken into custody; 9 lakhs cash, 25 tola gold seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.