पोलीस अंमलदारांना मारहाण, तिघांना दोन वर्षांची सक्तमजुरी
By प्रदीप भाकरे | Published: February 2, 2023 08:28 PM2023-02-02T20:28:36+5:302023-02-02T20:29:35+5:30
जिल्हा न्यायाधिश क्रमांक ३ आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने गुरूवारी हा निर्णय दिला.
अमरावती : स्थानिक तीन पोलीस अंमलदारांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायाधिश क्रमांक ३ आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने गुरूवारी हा निर्णय दिला. येथील राधानगरस्थित एका हॉटेलसमोर २७ सप्टेंबर २०१७ रोजी ती घटना घडली होती.
विधी सूत्रांनूसार, रामसिंग बन्सीगोपाल चंदेल (३०, रा. नांदगाव पेठ), अमोल रामकृष्ण वायल (३०, टाकरखेडा ता. देऊळगाव राजा, बुलडाणा) आणि रमेश साधुराम पाटील (२७ रा. मोथा, चिखलदरा) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिस अंमलदार राजीक रायलीवाले यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीनूसार, २७ सप्टेंबर २०१७ रोजी रायलीवाले हे हद्दीत पायी गस्त घालत होते. त्याचदरम्यान त्यांना सहकाऱ्यांकडून माहीती मिळाली कि, एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चार युवक गाडगेनगर परिसरात आरडाओरड, शांतताभंग करुन शिवीगाळ करत आहे. त्यावेळी रायलीवाले व त्यांचे अन्य सहकारी त्याठिकाणी जात असताना त्यांना ही कार कास्तकार हॉटेलसमोर दिसली.
त्यावेळी रायलीवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारमधील तरुणांना शांत रहा, आरडओरड करु नका, असे सांगितले. त्यावेळी कारमधील तिघांनी रायलीवाले यांच्यासह तिन पोलिसांना मारहाण केली होती. या प्रकरणाची तक्रार रायलीवाले यांनी गाडगेनगर पोलिसांत दिली. पोलिसांती तिघांविरुध्द शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले. आरोपींविरुध्द दोष सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी दोन वर्ष कारावास तसेच ५ हजार ७०० रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात शासकिय पक्षाकडून ॲड. सुनीत घोडेस्वार यांनी युक्तीवाद केला तर तपास अधिकारी म्हणून तत्कालीन एपीआय गणेश पवार हे होते.