‘त्या’ गणेशला धमकावल्याचा ऑडिओ पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:31 AM2020-02-11T05:31:38+5:302020-02-11T05:31:41+5:30
उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या गणेशने रॅगिंगला कंटाळून गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करुन जीवन संपविले.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश कैलास म्हेत्रे (वय २०) या विद्यार्थ्याला धमकावल्याच्या आॅडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या गणेशने रॅगिंगला कंटाळून गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करुन जीवन संपविले.
याप्रकरणी महाविद्यालयातील वरच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्याला विविध कारणांवरून छळले जात होते. ही बाब मोबाईल क्लिप मिळाल्यामुळे सोमवारी उघड झाली आहे. ही क्लिप पोलिसांना देण्यात आली असून, या विद्यार्थ्यांचा शोध लावून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी म्हेत्रे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी उदगीर पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. हा गंभीर प्रकार असून महाविद्यालयाच्या प्राचार्यावर व संबंधित विद्यार्थ्यांवर कडक करवाई करावी, अशी मागणी सावता परिषदेचे अॅड.सुभाष राऊत यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
चार वर्षे सिनिअरचा तुला त्रास होईल
गणेश याच्या मोबाईलमध्ये दोन कॉल रेकॉर्डिंग मिळून आल्या आहेत. यामध्ये ‘तू आम्ही सांगतो तसे कर, तू गावी जाऊ नकोस, तुझी जबाबदारी माझी आहे. तू गावी गेला तर तुला चार वर्षे त्रास होईल’ असे संभाषण असणारा एक कॉल आहे.
दुसरा कॉल रेकॉर्ड देखील अशाच प्रकारचा आहे, तुला चार वर्ष राहायचे आहे का? असा पुढील विद्यार्थी बोलत आहे. यावर राहायचे आहे, काय करणार असे गणेशने विचारले तेव्हा तो म्हणाला ‘तुला क्रॉस जायचे आहे का ? भांडणं करायचेत का? बघतो तुला, ये उद्या’ अशा प्रकारे धमकी दिली आहे.