कुख्यात मंगेश कडवची दमकोंडी करण्याची पोलिसांची तयारी; शिवसेनेने केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:13 PM2020-07-03T23:13:35+5:302020-07-03T23:13:58+5:30
पोलिसांनी केली व्यूहरचना : आणखी पीडित येणार पुढे
नरेश डोंगरे
नागपूर : अनेकांवर अन्याय, अत्याचार करून त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि स्वतःची तुंबडी भरून कोट्यवधीचा मालक बनलेला गुन्हेगार मंगेश कडव यांची दमकोंडी करण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यूहरचना केली आहे. दुसरीकडे अटकपूर्व जामीन मिळवून पोलिसांच्या तावडीतून आपली मानगूट सोडवून घेण्यासाठी मंगेश कडव आणि त्याचे साथीदार कामी लागले आहेत.
आतापर्यंत कडव याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा आणि बजाजनगर या तीन पोलीस ठाण्यात फसवणूक करून मालमत्ता हडपण्याचे आणि रक्कम हडपण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. अजून काही पीडित तक्रारी देण्याच्या मानसिकतेत आहे. आतापर्यंत दाखल झालेले गुन्हे मंगेश कडवच्या अन्य चर्चेत असलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत फारच शुल्लक असल्याचे आता पुढे आले आहे. यापेक्षा कितीतरी मोठे गुन्हे करून मंगेशने कोट्यवधीच्या मालमत्तेवर कब्जा मारल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. खास सूत्राच्या माहितीनुसार, मंगेश कडव याने त्याच्या साथीदारांना हाताशी धरून बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दहा कोटी रुपयांच्या बंगल्यावर कब्जा मारण्याचा प्रयत्न चालवला होता, अशीही माहिती पुढे आली आहे. या बंगल्याचा मालक अमेरिकेत राहतो. त्यामुळे मंगेशने ही मालमत्ता बळकावन्याचे प्रयत्न चालविले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आता पोलिसांकडे पोहोचणार आहेत.
दुसरे प्रकरण सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एका व्यक्तीला कडव याने लाखो रुपयांचा गंडा घातला आणि संबंधित व्यक्ती आपल्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी त्याच्याकडे गेला असता कडवने गुंडगिरीच्या करून त्याची मुस्कटदाबी केल्याचे वृत्त चर्चेला आले आहे. तिसरे एक प्रकरण प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तेथीलही एका वृद्ध व्यक्तीची कोट्यवधीची मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न कडवने चालविले होते, असेही आता चर्चेला आले आहे. याशिवायही अनेक प्रकरण चर्चेला आली असून कडवच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर त्याच्या अन्य गुन्ह्याचा बोभाटा होण्याची दाट शक्यता आहे.
पीडितांचे वेट न वॉच तूर्त अन्याय, अत्याचारग्रस्त मंडळी पोलिसांच्या कारवाईची वाट बघत आहेत. ही कल्पना आल्यामुळे मंगेश कडव याने आपल्या साथीदारांना कामी लावले असून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करीत आहे. तर पोलिसांनीही त्याची कोंडी करण्याची व्यूहरचना आखली आहे. या पार्श्वभूमीवर कडव यांच्या अटकपूर्व जामिनावरची प्रक्रिया शनिवारी होणार आहे. तत्पूर्वीच अनपेक्षित घडामोडी करून मंगेश कडवच्या मुसक्या बांधण्याची पोलिसांची योजना आहे. संतोष आंबेकरविरुद्ध केलेल्या कारवाई सारखीच धडाकेबाज कारवाई कडवविरुद्ध करण्याचीही पोलिसांची योजना आहे.
मनोबल खचले, आत्मसमर्पनाची तयारी
कडवच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा बोभाटा झाल्यानंतर त्याची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यामुळे कडव आणि त्याच्या साथीदारांचे मनोबल खचल्याची प्रतिक्रिया संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळाला नाही तर तो पुढच्या काही तासात आत्मसमर्पणही करू शकतो, असे सांगितले जाते.