गुन्हा दाखल असलेल्या सोलापूरच्या उपमहापौराला सोडून देणे पोलिसांना भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 11:41 PM2020-06-03T23:41:55+5:302020-06-04T11:39:19+5:30
एकच फ्लॅट नऊ जणांना विकल्याप्रकरणी सोलापूरच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.. मात्र चौकशी दरम्यान तो शिंकत, खोकत असल्याचे पाहून त्याला सोडून दिले..
पिंपरी : फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोलापूर येथील उपमहापौराला कोरोनाच्या भितीने नोटीस देऊन सोडून देणे सांगवी पोलिसांना भोवले आहे. याप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील एकच मिळकत अनेक जणांना विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सोलापूर येथील उपमहापौर राजेश दिलीप खिळे (वय ४०, रा. सोलापूर) याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांच्या पथकाने उपमहापौर काळे याला सोलापूर येथून ताब्यात घेतले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला सांगवी येथे आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी काळे याच्याकडे चौकशी सुरू केली. आपल्याला शिंका व खोकला आदी त्रास होतो आहे, असे काळे याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे कोरोनाच्या भितीने काळे याला पोलिसांनी सोडून दिले. चौकशीसाठी पुन्हा पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस त्यावेळी पोलिसांनी काळे याला दिली होती.
याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.