ठाण्यातील कासारवडवली येथील बारवर धाड: ३८ बारबालांसह ४५ जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 07:26 PM2019-08-18T19:26:13+5:302019-08-18T19:26:13+5:30
नियमापेक्षा जास्त वेळ बार सुरु ठेवून बारमध्ये गि-हाईकांना आकृष्ट करण्यासाठी तोकडया कपडयांमध्ये अश्लील नृत्य करणाऱ्या ३८ बारबालांसह बार व्यवस्थापक आणि मालक अशा ४५ जणांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रात्री उशिरापर्यंत चालणा-या घोडबंदर रोड येथील एका बारवर कासारवडवली पोलिसांनी रविवारी पहाटे २ वा. च्या सुमारास धाड टाकून ३८ बारबालांसह ४५ जणांना अटक केली. या सर्वांची तीन लाख ३७ हजार पाच रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर ठाणे न्यायालयाने सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोडवरील ‘खुशी’ या बारमध्ये नियमापेक्षा अधिक बारबाला लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करुन रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खैरनार यांच्यासह पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, अविनाश काळदाते, सहायक पोलीस निरीक्षक सतिश चाबुकस्वार आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास या बारवर धाड टाकून बारचा मालक विनोद शेट्टी (४२), व्यवस्थापक सुधाकर शेट्टी तसेच पाच गि-हाईक आणि ३८ बारबाला आदी ४५ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी बिभत्स वर्तन केल्याप्रकरणी या बार बालांवर तसेच विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरु ठेवून नियमापेक्षा जास्त मुलींना रात्रीच्या वेळी कामावर ठेवल्याप्रकरणी बार मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बार बालांसह बार मालक आणि व्यवस्थापक आदी ४५ जणांची प्रत्येकी सात हजार ५०० रुपयांप्रमाणे तीन लाख ३७ हजार ५०० रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर ठाणे न्यायालयाने सुटका केली.