भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड, १९ बारबाला व ७ बार कर्मचाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 09:44 PM2019-09-10T21:44:33+5:302019-09-10T21:45:44+5:30
पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत मीरा भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांचा अश्लील नाच, पैसे उडवणे आदी धिंगाणा चालला आहे.
मीरारोड - पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत मीरा भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांचा अश्लील नाच, पैसे उडवणे आदी धिंगाणा चालला आहे. तर दुसरीकडे नवघर पोलीसांनीई भाईंदर पूर्वेच्या अण्णा पॅलेस या भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकून अर्धनग्न अवस्थेत अश्लील नाच करणाऱ्या तब्बल १९ बारबालांना तसेच बारच्या चालकासह एकुण ७ कर्मचारायांना अटक केली आहे.
भाईंदर पुर्वेला भाजपा नगरसेवक गणेश शेट्टी यांचा अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बारवर आता पर्यंत अनेक वेळा पोलिसांनी धाडी टाकल्या असून अगदी वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी पीटा कायद्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. नवघर पोलिसांनी शनिवारी दाखल केलेल्या गुन्ह्यात अण्णा पॅसेल बार मधील तब्बल १९ बारबालांसह बारचा चालक रवी शेट्टी तसेच अन्य ६ कर्मचारी अशा एकूण २६ जणांना आरोपी केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी व प्रदीप पाटील सह पोलीस कर्मचारी भालेराव, तंबुरे, तडवी, नवाळे, ठाकुर, माने, कुसाळकर यांनी मध्यरात्री नंतर दीडच्या च्या सुमारास अण्णा पॅलेस बार वर धाड टाकली. त्यावेळी बार मध्ये मंद प्रकाशात स्टेजवर तब्बल १९ बारबाला तोकडे व उत्तान कपडे घालून होत्या व त्यातील १३ बारबाला अश्लील हावभावासह नाचत मद्यपान करत बसलेल्या पुरुष ग्राहकांसोबत लगट तसेच अंगविक्षेप करून नाचत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ऑर्केस्ट्रा बार मध्ये ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी आहे. तर कायदद्याने ऑर्केस्ट्रा बार मध्ये नृत्य करण्यास बंदी आहे. तसे असताना तब्बल १९ बारबाला बार मध्ये ठेवण्यात आल्या आणि अश्लील नृत्य चालत असल्याने बार चालक व मालकांना पोलिसांचा धाक राहिला नाही ? की अन्य अर्थपूर्ण कारण आहे ? यांचे परवाने रद्द कसे होत नाहीत ? असे प्रश्न नागरिकांमधून केले जात आहे.