पोलिसांची धाड! हुक्का पार्लर चालवणारा नगरसेविकेचा जावई फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:06 PM2019-07-17T20:06:08+5:302019-07-17T20:09:05+5:30
पेणकर पाड्यातील हुक्का पार्लवर पोलीसांची धाड
मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हदद्दीत पेणकरपाडा भागात एका गाळळ्यात चालवल्या जाणाराया हुक्का पार्लरवर पोलीसांनी धाड टाकुन पाच जणांना अटक केली आहे. तर सदर हुक्का पार्लर चालवणारा मनीष मकवाना पसार असून तो स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांचा जावई आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांना मिळालेल्या माहिती नंतर त्यांनी चौधरी, इंगळे, तावरे, गावडे, वैशाली आव्हाड या पोलीस कर्मचारायांसह पेणकर पाडा येथील न्यु लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये तिसऱ्या मजल्या वरील एका गाळ्यात सोमवारी रात्री धाड टाकली. काशिमीरा पोलीस देखील सोबत होते.
बेकायदा चालवल्या जाणाऱ्या या हुक्का पार्लर मध्ये संकेत सुरेश म्हात्रे (२४) रा. म्हात्रे निवास, शंकर मंदिर जवळ, पेणकरपाडा व शेजारी राहणारा सोमेश महादेव काळे (२०) हे हुक्का ओढत बसले होते. पोलीसांनी त्या दोघांसह हुक्का पार्लरचा व्यवस्थापक मुजिबुर खान (२१) रा. कांचन अपा. ठाकुर व्हिलेज, कांदिवली, रोखपाल रुद्रेश रविंद्र पवार (२२) रा. गावंड चाळ, पेणकरपाडा व वेटर इम्रान शेख (२१) अशा एकूण पाच जणांना अटक केली.
मंगळवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात या पचा जणांसह हुक्का पार्लरचा चालक तथा मालक असलेला मनीष मकवानावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मकवाना हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे म्हणाले. मकवाना हा स्थानिक नगरसेविका अनिता जयवंत पाटील यांचा जावई आहे. पाटील ह्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडुन आल्या असल्या तरी त्यांनी अमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांच्या भाजपा प्रवेशा वरुन शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात निदर्शने केली होती. नगरसेविकेचा जावईच हुक्का पार्लर चालवत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.