क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; समोर आलं छत्तीसगड कनेक्शन, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:57 PM2021-11-11T22:57:57+5:302021-11-11T23:08:02+5:30

कुख्यात शाहूचे क्रिकेट सट्ट्यात मोठे नाव आहे. त्याचे नागपुरातील बंटी ज्यूस, शैलू पान, पंकज कडी-समोसा यासारख्या बड्या बुकींसोबतही संबंध आहेत.

Police raid cricket betting venue two arrested in nagpur | क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; समोर आलं छत्तीसगड कनेक्शन, दोघांना अटक 

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; समोर आलं छत्तीसगड कनेक्शन, दोघांना अटक 

Next

नागपूर- छत्तीसगडच्या बुकीचे कनेक्शन (आयडी) घेऊन क्रिकेट सामन्याची सट्टेबाजी (Cricket Betting) करणाऱ्या दोन बुकींना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. अमजद खान नवाब खान पठाण (रा. भालदारपुरा) तसेच इरफान रियाज खान (वय ३२, रा. गांधी पुतळ्याजवळ, इतवारी), अशी त्यांची नावे आहेत.

भालदारपुऱ्यातील एका दर्ग्याजवळ राहणारा अमजदखान हा त्याच्या साथीदारासह स्वत:च्या घरात क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. त्यावरून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माधुरी नेरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खानच्या अड्ड्यावर बुधवारी रात्री ८.४५ वाजता छापा घातला. यावेळी अमजद खान तसेच इरफान खान दुबईत सुरू असलेल्या न्यूझिलंड विरुद्ध इंग्लंड दरम्यानच्या टी-२० क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून टीव्ही, लॅपटॉप, विविध कंपनीचे मोबाईल तसेच रोख सहा हजार, असा एकूण एक लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अमजद तसेच रियाजला गणेशपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील कुख्यात शाहूचे नागपुरातही नेटवर्क -
बुकी अमजद आणि रियाज खान हे दोघे राजनांदगाव(छत्तीसगड)मधील कुख्यात बुकी अमरित शाहू याच्याकडे सट्ट्याची उतारी (कटिंग) करीत असल्याचे आणि त्यानेच दिलेल्या आयडीवर हे दोघे सट्टेबाजी करीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांनी त्यालाही आरोपी बनविले आहे. कुख्यात शाहूचे क्रिकेट सट्ट्यात मोठे नाव आहे. त्याचे नागपुरातील बंटी ज्यूस, शैलू पान, पंकज कडी-समोसा यासारख्या बड्या बुकींसोबतही संबंध आहेत. ही मंडळी काही भ्रष्ट पोलिसांना तसेच सराईत गुंडांना हाताशी धरून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी करतात. त्यातून त्यांनी अनेक बड्या घरच्या तरुणांची मालमत्ताही हडपलेली आहे. लोकमतने क्रिकेट सट्टेबाजांबाबतचे वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले आहे.

Web Title: Police raid cricket betting venue two arrested in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.