नागपुरातील गंगाजमुनात पोलिसांची धाड : ३१ वारांगनांसह ७ जणांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:49 PM2020-02-12T22:49:36+5:302020-02-12T22:51:49+5:30
गंगाजमुना परिसरात पोलिसांनी बुधवारी धाड टाकून ३१ वारांगनांसह ७ ग्राहकांना ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगाजमुना परिसरात पोलिसांनी बुधवारी धाड टाकून ३१ वारांगनांसह ७ ग्राहकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून बंदिस्त असलेला वारांगनांचा व्यवसाय रस्त्यावर आला होता. अनेक नागरिकांनी याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना पाहून हातवारे करणे, अश्लील हावभाव करणे हे प्रकार घडत होते. त्यामुळे लकडगंज पोलिसांनी बुधवारी दुपारी १२ वाजता या परिसरात धाड टाकली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. धाड पडल्याचे पाहून अनेक आंबटशौकिनांनी पळ काढला, तर काही वारांगनांनी वस्तीतून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वस्तीला घेराव घातला होता. महिला पोलीस प्रत्येक मार्गावर उभ्या होत्या. पोलिसांनी वारांगनांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले, तर आंबटशौकिनांवर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. ही कारवाई लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, राजेंद्र सानप, सहायक पोलीस निरीक्षक राखी गेडाम, विलास पाटील, सुनील राऊत यांनी पार पाडली.