यवतमाळमध्ये मोठी कारवाई; कुंटणखान्यांवर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 09:28 PM2020-12-27T21:28:28+5:302020-12-27T21:28:56+5:30
Crime News: संयुक्त कारवाई : चारही पोलीस ठाण्यातील पथकांवर जबाबदारी
यवतमाळ : शहरातील अवैध व्यवसायाचा बंदोबस्त करण्यासाठी योजनाबद्ध रणनिती आखली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या निर्देशावरून मोहीम फत्ते करण्यासाठी वेळेवर पथकाचे गठन केले जाते. त्याप्रमाणेच रविवारी सायंकाळी यवतमाळ शहरातील कुंटणखान्यांवर अचानक धाडी घालण्यात आल्या.
यासाठी लोहारा, अवधुतवाडी, शहर आणि यवतमाळ ग्रामीण ठाणेदारांवर जबाबदारी सोपविण्यात आली.शहर ठाणेदार धनंजय सायरे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये चालत असलेल्या कुंटणखान्यावर धाड घातली. तेथून महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. लोहारा ठाणेदार मिलन कोयल व ग्रामीण ठाणेदार गजानन करेवाड यांच्या पथकाने लोहारा परिसरातील देवीनगर भागात चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड घालून काही संशयितांना ताब्यात घेतले.
अवधुतवाडी पोलिसांच्या पथकाने जामनकरनगर, उमरसरा येथील कुंटणखान्यांचा सर्च केला. तेथे नेमकी काय स्थिती होती याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या धाडसत्राचे नियंत्रण अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे यांनी केले. पोलिसांनी अचानक केलेल्या हालचालीमुळे आंबटशौकिनांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
यवतमाळातील नामांकित वस्त्यांमध्ये देहविक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी धाडी घातल्या ते सर्व ठिकाण कुप्रसिद्ध आहे व बऱ्याच वर्षांपासून तेथे देहविक्रीचा व्यवसाय चालविला जातो. पिंपळगाव परिसरातही कुंटणखाने चालविले जातात. अपार्टमेंट व सुखवस्तू परिसरात चालणाऱ्या या व्यवसायाची सामान्य नागरिकांत प्रचंड चीड आहे. आतापर्यंत ठोस अशी कारवाई होत नसल्याने देहविक्रीचे अड्डे चालविणाऱ्यांचेही चांगलेच फावत होते. अचानक झालेल्या कारवाईचा धसका या अड्डाचालकांनी घेतला आहे. कारवाईत नेमकी किती जणांना अटक झाली, त्यांच्याविरूद्ध कुठले गुन्हे दाखल केले जाणार याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. वृत्तलिहिस्तोवर रात्री उशिरापर्यंत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.