पोलिसांना व्हॉट्सॲपवर मॅसेजेस येताच जुगाराच्या पाच अड्ड्यांवर धाडी; 25 जणांना बेड्या
By अझहर शेख | Published: August 22, 2023 03:49 PM2023-08-22T15:49:15+5:302023-08-22T15:50:07+5:30
२५ जुगाऱ्यांना साहित्य व रोकडसह ताब्यात घेण्यात आले. या छापेमारीत सुमारे ६० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नाशिक : पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘पोलिस कंट्रोल रूम’ची व्हॉट्स हेल्पलाइन सुरू करण्यात आली. या हेल्पलाइनला अवघ्या तीन दिवसांतच नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. चोरीछुप्या पद्धतीने डाव रंगवून पत्ते कुटले जात असल्याचे मॅसेज नागरिकांनी पाठवताच शहरात सुमारे पाच ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या. २५ जुगाऱ्यांना साहित्य व रोकडसह ताब्यात घेण्यात आले. या छापेमारीत सुमारे ६० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाचे ‘कंट्रोल रूम’ आता व्हॉट्सॲपवर आले आहे. पोलिस नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी यापूर्वी लॅण्डलाइन क्रमांक फिरवावा लागत होता; मात्र आता या क्रमांकासह मोबाइलचा दहाअंकी व्हॉट्सॲप क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांकडून लहान-मोठ्या गुन्हेगारी कृत्यासह अवैध धंद्यांबाबतचाही मेसजे पोलिसांना प्राप्त होऊ लागला आहे. यामुळे आता जुगाराचे डाव आणि ओल्या पार्ट्या रंगविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पंचवटीतील इंद्रकुंड भागात पहिली कारवाई झाली. येथील पलुस्कर उद्यानाच्या मोकळ्या जागेत ५२पानी अंदर-बाहर पत्त्याचा डाव रंगविण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी छापा टाकून संशयित जुगारी सुरेश कटारे (३१), विनायक कासार (४५), गणेश लोणारे (२८), सुशांत बरडिया (३३) यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्यात आले.
दुसऱ्या कारवाईत त्र्यंबकरोडवरील तिडके कॉलनीमधील एका मोकळ्या जागेत ५२ पानी पत्त्यांच्या कॅटवर तीनपानी तिरट नावाचा जुगार रंगविण्यात आला होता. सरकारवाडा पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली. तेथे संशयित जगदीश पाटील (४२), दीपक धोत्रे (४८), साहेबराव शिंदे (६१), दिलीप पाटील (६५), आनंद साळुंके (४०) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ४हजार २७० रुपये रोख व जुगार साहित्य आढळून आले. त्यांच्याविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीसऱ्या कारवाईत त्रिमुर्तती चौकातील एका खासगी क्लासेसच्या पाठीमागे मोकळ्या भुखंडावर जुगाराचा डाव खेळला जात होता.
पोलिसांनी छापा मारून संशयित ज्ञानेश्वर शिंदे (२४), गजानन ठेलगड (४०), प्रदीप पाटील (२३), उमेश नखाते (२५) या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजार ३१० रूपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. चौथ्या कारवाईत नाशिकरोड पोलिसांनी हिंगणवेढे-लाखलगाव रस्त्यावर एका झाडाखाली जुगार खेळणाऱ्यांता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ हजार ६० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. पाचव्या कारवाईत अंबड पोलिसांनी संजीवनगर येथे छापा टाकला. तेथे रियासत खान, अन्वरउल्ला खान, मोहसिन मिर्झा, असीम खान, शेरमोहंमद खान, आझम खान, जमाल खान या सात संशयितांना ताब्यात घेतले. त्याचं्याकडून जुगार साहित्यासह २७ हजार ४०० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.
कंट्रोल रूममधून जातो ‘वायरलेस मॅसेज’
अवैध धंदे व गैरप्रकार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी व्हॉट्सॲपचा आधार घेतला आहे. या क्रमांकावर प्राप्त झालेल्या मॅसेजेसच्या लोकेशननुसार त्वरित त्या पोलिस ठाण्यात कंट्रोल रूमद्वारे बिनतारी संदेश यंत्रणेवर माहिती दिली जाते व त्वरित कारवाईसाठी पथक त्या पोलिस ठाण्यातून रवाना केले जाते, असे आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले. कारवाई होताच त्याबाबतची माहिती कंट्रोल रूमला पुन्हा कळविली जाते.