सराफाकडून ७५० ग्रॅम सोने पोलिसांनी केले वसूल, अटक टाळण्यासाठीचा खटाटोप यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 05:01 PM2022-08-07T17:01:48+5:302022-08-07T17:03:13+5:30

Crime News : ही कारवाई शनिवारी रात्री ११.३० पर्यंत सुरू होती. सराफाला सूचना पत्र देवून पोलीस रविवारी सकाळी निघून गेले.

Police recovered 750 grams of gold from jweller, successful attempt to avoid arrest | सराफाकडून ७५० ग्रॅम सोने पोलिसांनी केले वसूल, अटक टाळण्यासाठीचा खटाटोप यशस्वी

सराफाकडून ७५० ग्रॅम सोने पोलिसांनी केले वसूल, अटक टाळण्यासाठीचा खटाटोप यशस्वी

googlenewsNext

यवतमाळ : मुंबईतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात सात कोटी रुपयांच्या सोने-चांदी अपहाराचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची पथक आरोपीसह यवतमाळात आले होते. त्यांनी शनिवारी दिवसभर सराफा दुकानांची झाडाझडती घेतली. त्यात दोन सराफांनी या अपहारातील सोने-चांदी खरेदी केल्याचे उघड झाले. तब्बल ७५० ग्रॅम सोने पोलिसांनी वसूल केले. ही कारवाई शनिवारी रात्री ११.३० पर्यंत सुरू होती. सराफाला सूचना पत्र देवून पोलीस रविवारी सकाळी निघून गेले.

यवतमाळातील सराफा बाजारातील दोन ज्वेलर्समध्ये मुंबई पोलीस पथकाने धाड टाकली. नंतर त्यांना चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात बोलाविले. बाबू, प्रतीक, राजा या तिघा भावांची कसून चौकशी केली. पोलिसांनी ६०० ग्रॅम सोने हस्तगत केले. यात प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाची सोन्याची सहा बिस्कीटे होती. तर दुसऱ्या सराफाकडून दीडशे ग्रॅम सोने घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात सराफाविरुद्धही पोलिसांन कारवाई करता येते. मात्र ही कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी तीन लाखांची तडजोड केली. यात स्थानिक राजकारण्याच्या नातेवाईकाची शिष्टाई यशस्वी ठरली. पोलीस पथकाच्या कारवाईत हा नातेवाईक होता. दिवसभर लुडबूड केल्यानंतर रात्री उशिरा त्याला यश आले. अपहाराचा माल घेणाऱ्या सराफांना वाचविण्यासाठी त्याने पुरेपूर प्रयत्न केले.

सात कोटींच्या सोन्याचा अपहार केल्याची तक्रार मुंबईतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात दाखल आहे. यात आरोपी गजानन तनसुखराय अग्रवाल (३८) उर्फ गणू भैय्या याला अटक झाली आहे. पोलीस कोठडीत असतानाच पथकाने त्याला यवतमाळात आणले. त्यानंतर रविवारी सकाळी पोलीस पथक चंद्रपूरकडे रवाना झाले. यवतमाळातील एकंदर कारवाई संदर्भात टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुशील वंजारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळले. या प्रकरणात कुणाला आरोपी करणार हेही त्यांनी स्पष्ट केले नाही. दोन्ही सराफांना मुद्देमाल घेवून सूचना पत्र देण्यात आल्याची माहिती आहे.

वर्षभरापूर्वीचा व्यवहार, चांदीचा हिशेब नाही

अपहारातील सोने खरेदीत अडकलेल्या दोन सराफांनी वर्षभरापूर्वीच्या व्यवहारातील मुद्देमाल काढून देण्यासाठी धडपड सुरू केली. रात्री त्यांनी इतरांकडून उसनवारीवर सोने जमा करून एकाने ६०० ग्रॅम व दुसऱ्याने १५० ग्रॅम सोने दिले. याशिवाय चांदीच्या व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या बाबूच्या चांदी खरेदीचा हिशेब झालाच नाही. त्यातूनही मोठे गौडबंगाल बाहेर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Police recovered 750 grams of gold from jweller, successful attempt to avoid arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.