डोंबिवलीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 09:41 PM2021-07-28T21:41:33+5:302021-07-28T21:42:00+5:30
sex racket in Dombivli : डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीसमोर साईराज लॉजिंग अँड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची खबर मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती.
कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. अचानक टाकण्यात आलेल्या या छाप्यात चार तरुणींची सुटका करण्यात आली असून या कारवाईत लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह ६ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने ही कारवाई केली आहे. त्यामुळे गजबजलेल्या परिसरात सुरू असलेल्या या अनैतिकत धंद्याबद्दल स्थानिक पोलिसांना काहीच माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीसमोर साईराज लॉजिंग अँड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची खबर मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती. सोमवारी रात्री या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. यावेळी चार तरुणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या आहेत. साईराज उर्फ विराज लॉजिंग बोर्डिंगमध्ये अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता.
लॉजमध्ये पोलिसांनी बोगस गि-हाईक पाठवून प्रथम खात्री केली.त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह टिळकनगर पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. त्यानंतर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींच्या पुरवठा करणा-या दोन दलालांना ताब्यात घेत ४ तरुणींची सुटका केली. टिळकनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. डोंबिवलीमध्ये दाटीवाटीच्या परिसरात हा प्रकार सुरू होता. मात्र स्थानिक पोलिसांना याचा कोणताही सुगावा लागला का लागला नाही? असा सवाल निर्माण झाला आहे. मात्र ठाणे पोलिसांनी हा सर्व प्रकार उघड केल्याने ठाणे पोलिसांच्या कामगिरीच सर्वत्र कौतुक होत आहे.