रेरा प्रकरणातील पाच आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
By मुरलीधर भवार | Published: November 5, 2022 05:57 PM2022-11-05T17:57:15+5:302022-11-05T17:58:54+5:30
खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून या खोटय़ा परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले होते.
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका आणि रेरा प्राधिकरण फसवणूक प्रकरणी एसआयटीने काल पाच जणांना अटक केली होती. या पाचही जणांना एसआयटी पथकाने आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या पाचही जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून या खोटय़ा परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले होते. या प्रकरणी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेने या प्रकरणात तक्रार दिल्यावर पोलिसांनी ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास एसआयटीक करीत आहे. एसआयटीने खोटे कागपत्रे तयार करणा:या पाच जणांनी आधी मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हमकर, राहूल नवसागरे, जयदीप त्रिभूवन आणि कैलास गावडे यांचा समावेश होता. या पाचही जणांना आज कल्याण न्यायालयात हजर केले. पुढील तपासाकरीता न्यायालयाने यांना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी एसआयटीकडून करण्यात आली होती. बचाव पक्षाच्या वकिलांकडून पाचही जणांना जामीन मिळावा असा युक्तीवाद करण्यात आला. मात्र न्यायालयाने पाचही जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान एसआयटी पथकाचे अधिकारी सरदार पाटील आणि संपत पडवळ यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहेत. मात्र नागरीकांनी अशा प्रकारच्या बनावटीकरणाला बळी पडू नये. तसेच अशा प्रकारची कोणाची फसवणूक होत असल्यास त्यांनी तपास पथकाला तशी कल्पना द्यावी असे आवाहन केले आहे.