शुक्लांवर खटल्यासाठी पोलिसांची केंद्राकडे धाव; फोन टॅपिंग प्रकरणी मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:44 AM2022-08-10T06:44:11+5:302022-08-10T06:44:15+5:30
कुलाबा पोलीस ठाण्याने शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी २६ एप्रिल २०२२ रोजी आरोपपत्र दाखल केले.
मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालविण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर केल्याचे मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी ३ ऑगस्टला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे.
कुलाबा पोलीस ठाण्याने शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी २६ एप्रिल २०२२ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर खटला चालविण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आरोपपत्र दाखल करतेवेळी सरकारने म्हटले की, शुक्ला यांनी केलेले कृत्य त्यांच्या कर्तव्याच्या कक्षेत येत नव्हते. त्यामुळे शुक्ला यांच्यावर खटला भरविण्यासाठी केंद्राच्या मंजुरीची आवश्यकता नाही. भाजपच्या काळात गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना शुक्ला यांनी शिवसेना व काँग्रेसच्या काही नेत्यांचे बेकायदा फोन टॅप केले होते.