दोन मुली बेपत्ता झाल्याच्या शक्यतेने पोलिसांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 06:20 AM2018-11-08T06:20:40+5:302018-11-08T06:20:53+5:30
घरी न सांगता मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे पोलिसांची सोमवारी रात्री काही काळ धावपळ उडाली.
मुंबई : घरी न सांगता मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे पोलिसांची सोमवारी रात्री काही काळ धावपळ उडाली. मुलीच्या पालकांनी मेघवाडी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पथके राबवून मंगळवारी रात्रभर शोधमोहीम राबविली. मात्र त्या अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात सुखरुप आढळल्याने पोलिसांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.
जोगेश्वरीतील पूजा (नावात बदल) ही तेरा वर्षांची मुलगी सोमवारी काहीच न सांगता घरातून निघून गेली. बरीच शोधाशोध करूनही ती न सापडल्याने अखेर ती हरवल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली.
या तक्रारीनुसार तिचा शोध घेत असतानाच याच परिसरातील तिची मैत्रिण निशा (नावात बदल) ही बेपत्ता असल्याचे उघडकीस आले. कुणीतरी त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मेघवाडी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० ने या दोन्ही मुलींचा शोध सुरू केला.
तांत्रिक तपासासोबत स्थानिक खबऱ्यांची मदतदेखील घेण्यात आली. तपासाअंती अंधेरी रेल्वेस्थानक परिसरात या दोघींचे लोकेशन पोलिसांना सापडले. त्यानुसार दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता एका मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी एकत्र तिच्यासोबत गेलो होते, असे या मुलींनी पोलिसांना सांगितले. तेथून घरी परतताना उशीर झाला असे उत्तरही त्यांनी पोलिसांना दिले. दोघींनाही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुली सापडल्याने त्यांच्या कुटुंबानेही सुटकेचा श्वास टाकला.