पुढचं जीवन कसं जगणार?; वडिलांच्या मृत्यूनंतर दोन सख्ख्या बहिणींना जीव झाला नकोसा अन् उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:39 PM2021-08-04T17:39:18+5:302021-08-04T17:39:39+5:30

Suicide Case :एकीचा मृत्यू तर दुसरीला वाचवण्यात पोलिसांना यश

Police save one and another died; After the death of the father, the daughters did not die | पुढचं जीवन कसं जगणार?; वडिलांच्या मृत्यूनंतर दोन सख्ख्या बहिणींना जीव झाला नकोसा अन् उचलले टोकाचे पाऊल

पुढचं जीवन कसं जगणार?; वडिलांच्या मृत्यूनंतर दोन सख्ख्या बहिणींना जीव झाला नकोसा अन् उचलले टोकाचे पाऊल

Next
ठळक मुद्दे याबाबत अर्नाळा पोलिसांनी सोशल मीडियावर या महिलेबाबतची माहिती देऊन ओळख पटवण्यासाठी आवाहन केले होते.

मंगेश कराळे

नालासोपारा : वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पुढचे जीवन कसे जगणार, या भीतीपोटी दोन सख्खा बहिणींनी आत्महत्या करण्याचा प्लान आखला. यात एकीने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली तर दुसरीला समुद्रात जीव देताना पोलिसांनी वाचवले. वाचवलेल्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून विरारमध्ये राहणाऱ्या परिवाराची धक्कादायक बाब बुधवारी सकाळी उघड झाली आहे.


मूळचे नागपूरचे हरिदास सहारकर (७१) हे पत्नी आणि दोन मुलींसह विरारच्या गोकूळ टाऊनशिपमधील ब्रोकलीन अपार्टमेंटमध्ये आठ दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या सदनिकेत राहत होते. ते माजी रेशनिंग अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांच्या निवृत्तीच्या पेन्शनवर घर चालत होते. त्यांना विद्या (४०) आणि स्वप्नल (३६) या दोन अविवाहित मुली होत्या. १ ऑगस्टच्या रात्री हरिदास यांचे हार्टअटॅकने निधन झाले. पण वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे मुलींना वाटले. वडिलांचा मृत्यू झाल्याचे लपवून ठेवत घरातच मृतदेह ठेवला होता. दोन्ही बहिणींनी यापुढचे आपले आयुष्य कसे जाणार, वडिलांची पेन्शन आईला मिळणार, पण आई आश्रमात राहायला जाणार असल्याने आपले कसे होणार, या भीतीपोटी दोघी बहिणींनी आत्महत्या करण्याचा प्लान आखला, पण आईला याबाबत काही कळू न देण्याचे त्यांनी ठरवले. दोघींनी कोणत्या तरी गोळ्या खाऊन व हातावर ब्लेड मारून घेत मरण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयशी ठरल्या. मंगळवारी सकाळी विद्या घरातून काहीही न सांगता नवापूर समुद्रकिनारी येऊन उडी मारून आत्महत्या केली. याबाबत अर्नाळा पोलिसांनी सोशल मीडियावर या महिलेबाबतची माहिती देऊन ओळख पटवण्यासाठी आवाहन केले होते.


बुधवारी सकाळी स्वप्नलही नवापूर येथील समुद्रकिनारी जीव देण्यासाठी आल्यावर एका जागृत नागरिकाने पाहिले व गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक उमेश खाडे यांना फोनवरून माहिती दिली. तातडीने पोलीस नवापूर समुद्रकिनारी गेल्यावर तिला जीव देण्यापासून वाचवले. आत्महत्या कोणत्या कारणामुळे करत असल्याची विचारणा केल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलिसांनी मंगळवारी मिळालेल्या महिलेच्या मृतदेहाचे फोटो दाखवल्यावर मोठी बहीण असल्याचे सांगून ओळख पटली. मृत्यू झालेल्या बहिणीच्या हातावर असलेले ब्लेडचे वार तसेच वार स्वप्नलच्या हातावर पोलिसांना दिसले.

 

त्यांच्या वडिलांचा १ ऑगस्टला मृत्यू झाल्यानंतर आपले पुढचे आयुष्य कसे जाणार अशी या दोघी बहिणींना भीती होती. यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्लान आखला होता. यातील एका बहिणीचा मृत्यू झाला तर एकीला वाचविण्यात आले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावली नव्हती. तो मृतदेहदेखील ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. - प्रमोद बडाख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट नंबर-३

Web Title: Police save one and another died; After the death of the father, the daughters did not die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.