पोलिसांकडून ३६ लाखांचे मोबाइल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:58 AM2019-10-03T01:58:23+5:302019-10-03T01:58:49+5:30
मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाइलचोरीच्या घटना वाढल्या आहेत.
डोंबिवली : मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाइलचोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे पोलिसांनी सापळा लावला. रुळांमधून चालत येणाऱ्या चार जणांनी पोलिसांना पाहताच त्यांच्याकडील बॅगा तेथेच फेकून पळ काढला. या बॅगांमध्ये ३५ लाख ८५ हजार किमतीचे एकूण १९४ मोबाइल सापडल्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी. शार्दुल यांनी सांगितले. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार बी.एच. भोईनवाड आणि एन.पी. मान हे पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते. सकाळी ८.४५ वाजता कल्याणहून विठ्ठलवाडीच्या दिशेने रेल्वे रुळांतून चालत येणाºया चार जणांना पोलिसांनी हटकताच त्यांनी त्यांच्याकडील दोन छोट्या बॅगा आणि एक लगेज बॅग तेथील गवतात टाकून कोळसेवाडीच्या दिशेने पळ काढला. या बॅगा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून तपासल्या असता त्यात १९४ मोबाइल आढळून आले. त्यांची एकत्रित किंमत ३५ लाख ८५ हजार १०६ रुपये असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइलच्या मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी चौकशी केली असता नारपोली येथे मोबाइल फोनसंदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून त्या दिशेने तपास सुरूअसल्याचे शार्दुल यांनी सांगितले.