हवालाचे सव्वाचार कोटी जप्त, गोंदियातील दोघांसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 10:47 PM2022-03-04T22:47:43+5:302022-03-04T22:59:56+5:30

Crime News : पोलिसांच्या पथकाने धाड टाकून ही रक्कम जप्त केली.

Police seize 4 crores of rupees in Nagpur kotwali | हवालाचे सव्वाचार कोटी जप्त, गोंदियातील दोघांसह तिघांना अटक

हवालाचे सव्वाचार कोटी जप्त, गोंदियातील दोघांसह तिघांना अटक

Next

नागपूर : परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घातला. पोलिसांनी येथे तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ कोटी २० लाखांची रोकड जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित करून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभारपुऱ्यात इंद्रायणी साडीच्या मागे एक अपार्टमेंट आहे. तेथे शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा घातला. तेथे नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय ४५) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (वय ५२, दोघेही रा. गोंदिया) हे तिघे नोटा मोजताना आढळले.

पोलिसांचा छापा पडताच हे तिघे घाबरले. त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. ते हवाला व्यावसायिक असल्यामुळे ही रोकडही हवालाची असल्याचा अंदाज बांधून ४ कोटी, २० लाखांची रोकड तसेच या तिघांना ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली ती सदनिका नेहाल वडालिया याची असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो अनेक दिवसांपासून हवालात गुंतला आहे. या कारवाईत स्वत: उपायुक्त राजमाने यांचा पुढाकार होता. एसीपी सुर्वे, पीआय ठाकरे, पीआय अरविंद पवार, एपीआय संदीप बागुल, दीपक वानखेडे आणि त्यांचे सहकारी मध्यरात्रीपर्यंत या कारवाईत गुंतले होते.

नोटा मोजून थकले पोलीस
पाचशे, दोन हजार आणि इतर मूल्यांच्या नोटांचे बंडल एवढे जास्त होते की मशीनच्या साह्याने नोटा मोजूनही पोलिसांची दमछाक झाली. हवालाच्या या सव्वाचार कोटींपैकी बरीचशी रक्कम पच्चीकार आणि दिवानीवाल यांनी गोंदियाहून आणली. ते शुक्रवारी दुपारीच नागपुरात आले. त्यांनी येथील काही व्यापाऱ्यांकडूनही रोकड गोळा केली.

Web Title: Police seize 4 crores of rupees in Nagpur kotwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.