पोलिसही चक्रावले; जेव्हा पाच वर्षांपूर्वी झालेली 'ती' चोरी ५ नव्हे तर ५० लाखांची होती हे कळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 10:20 PM2020-08-08T22:20:40+5:302020-08-08T22:23:04+5:30
५० लाखांची चोरी करून आरोपीने जमीन,फ्लॅट, दुचाकी,चारचाकी खरेदी केले....
५ नाही ५० लाखांची झाली होती घरफोडी
५ वर्षांनी नाट्यमयरित्या उघडकीस : डेक्कन पोलिसांची कामगिरी
पुणे : प्रभात रोडवरील फ्लॅटच्या गॅलरीत प्रवेश करुन महिलेवर चाकू हल्ला करुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्या ठिकाणी आपण ५ वर्षांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली व त्यात मोठा माल मिळाला असून त्या पैशातून जमीन, फ्लॅट, मोटार,कार घेतल्याची कबुली दिली. त्यावर पोलिसांनी आपले रेकॉर्ड काढून पाहिले तर त्यात फक्त ५ लाख रुपयांची घरफोडी झाल्याची नोंद होती.आरोपीकडील माल आणि प्रत्यक्ष फिर्याद याचा ताळमेळ बसत नसल्याचे पोलीस चक्रावून गेले. त्यांनी फिर्यादीला बोलावल्यावर त्यांनी ५ वर्षापूर्वी खरोखरच ५० लाखांची रोकड व दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. मात्र, पत्नीला याचा मानसिक धक्का बसेल, म्हणून त्यांनी ५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. ते चोरटे पुन्हा त्याच इमारतीत चोरी करायला येतात काय व पकडले जातात काय आणि पूर्वीचा तोही तब्बल ५० लाखांचा गुन्हा एका नाट्यमयरित्या उघडकीस आला आहे.
प्रभात रोडवरील ग्रीन सोसायटीत शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया सोमनाथ बंडु बनसोडे (वय ४७, रा़ वारजे माळवाडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आपण व चुलत भाऊ सुधाकर मुरलीधर बनसोडे (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक) याच्या मदतीने याच ठिकाणी २०१५ मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०१५ मध्ये ४ लाख रोख व १ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी सुधाकर बनसोडे याला अटक करुन चौकशी केली. त्यात त्याने ५० लाखांपैकी आपल्या २८ लाख रुपये मिळाले़ त्यातून मांजरी येथे २० लाखाला जागा विकत घेतली. एक कार व मोटारसायकल विकत घेतली. चोरीचे काही दागिन्यांपैकी काही दागिने तारण ठेवून कर्ज घेतले व काही विकल्याचे सांगितले. सोमनाथ बनसोडे याने मिळालेल्या २२ लाख रुपयांतून भूगाव येथे फ्लॅट विकत घेतला. सोन्याचे दागिने मोडले.
या दोघाही आरोपींकडून दोन घरे, कार, मोटारसायकल असा ५० लाखांचा माल तसेच तारण ठेवलेले व मोडलेले दागिने असा १२ लाख ९५ हजारांचा माल ५ वर्षांनंतर हस्तगत केला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, निरीक्षक राजू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सविता भागवत, सहायक फौजदार हरीश्चंद्र केंजळे, हवालदार संजय शिंदे, धोंडोपंत पांचाळ, पोलीस शिपाई विजय चिरमे, सचिन चव्हाण, बाळासाहेब भांगले, प्रविण कांचन यांनी केली आहे.