रस्त्यांची दुरावस्था पोलिसांना बघवेना! भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:53 PM2021-09-13T17:53:06+5:302021-09-13T17:53:55+5:30
Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीतील रस्त्यांची दुरावस्था झाली असून तेथील सर्वच रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे वेळ आल्याने भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात. मात्र रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने वाहतूक पोलिसांना या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने वाहतूक पोलिसांनीच भिवंडी शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे.
भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी , कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात व नुकसान देखील खड्ड्यांमुळे होत असल्याने याला सर्वस्वी जबाबदार वाहतूक पोलिसांना नागरिक ठरवतात. त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी की, रस्त्यांवरील खड्डे बुजवावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नारायण राणे रायगड पाेलिसांसमाेर हजर; व्हाॅईस सॅम्पल घेतले नाहीhttps://t.co/hidKyjZeuG
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021
पंधरा दिवसापूर्वी मनसैनिकांनी खड्ड्यांच्या विषयावरून मालोडी टोलनाका फोडला होता. तसेच पडघा टोल नाका व कशेळी टोल नाका या दोन्ही टोल नाक्यांवर आंदोलन करून टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांवरील खड्याच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. शिवाय खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील विविध मार्गावरून काढण्यात आली. त्यावेळेस तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र त्याही रस्त्यांवर खड्ड्यांनी डोके वर काढले आहेत. त्यामुळेच वाहतूक पोलिसांवर खड्डे भरण्याची वेळ आली आहे.